Varsha Gaikwad Sarkarnama
मुंबई

Varsha Gaikwad : 'सरकारमध्ये लाज नावाची गोष्ट उरली आहे का?'

Pradeep Pendhare

Mumbai News : राष्ट्रवादी काँग्रेस नेते माजी मंत्री आमदार बाबा सिद्दिकी यांची मुंबईत झालेल्या हत्येवरून राज्याभरात पडसाद उमटले आहे. महायुती सरकारमध्ये भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्याकडे असलेल्या गृह विभागाच्या कारभारावर टीका होऊ लागली आहे.

काँग्रेस नेत्या खासदार वर्षा गायकवाड यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देवेंद्र फडणवीस यांचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी करत सरकारमध्ये लाज नावाची गोष्ट उरली आहे का? असा सवाल केला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार (Ajit Pawar) गटाचे नेते बाबा सिद्दिकी यांची काल रात्री मुंबईतील वांद्रे इथं त्यांचे पुत्र झिशान सिद्दिकी यांच्या कार्यालयासमोर गोळ्या घालून हत्या करण्यात आली. बिष्णोई गँगने हत्येची जबाबदारी घेतली आहे. या हत्येमधील दोघा हल्लेखोरांना मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. दोघा हल्लेखोरांचा शोध सुरू आहे. या घटनेत वेगवेगळे कंगोरे समोर येऊ लागले आहेत. मुंबईतील बाॅलिवूड कनेक्शन असल्याने तपासाचा गुंता सोडवण्याचं आव्हान मुंबई पोलिसांसमोर आहे. मात्र, या घटनेनंतर राज्यातील महायुती सरकारविरोधात राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे.

विरोधकांनी, महाविकास आघाडीने राज्यातील शांतता-सु्व्यवस्थेवरून महायुती सरकारला, देवेंद्र फडणवीस यांच्याकडे असलेल्या गृह विभागाला धारेवर धरले आहे. काँग्रेस (Congress) नेत्या खासदार वर्षा गायकवाड यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देवेंद्र फडणवीस यांचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी केली आहे.

वर्षा गायकवाड यांनी म्हटले आहे की, "बाबा सिद्दिकी यांची हत्या झाली आणि राज्यातील कायदा-सु्व्यवस्थेचा पर्दाफाश झाला. यापूर्वी अभिषेक घोसाळकर, सचिन कुर्मी यांच्या हत्या झाल्या आहेत. परंतु बाबा सिद्दिकींना 'वाय' दर्जाची सुरक्षा व्यवस्था असून देखील हत्या झाली. यामुळे राज्यातील सरकारच्या राजवटीत ना सुरक्षा आहे, ना न्याय". दररोज हत्या, महिलांवर अत्याचार, हिट अँड रनच्या घटना होत आहेत. त्यांचे नेते खुलेआम पोलिसांना म्हणतात, तुम्ही माझं काहीच बिघडवू शकत नाही. पोलिस यंत्रणेला चेष्टेचा विषय बनवून ठेवलं आहे, असा घणाघात वर्षा गायकवाड यांनी केला.

गुंड मंत्रालयात फिरतात

"यांचे नेते पोलिस ठाण्यामध्ये गोळ्या झाडतात, त्यांचे कार्यकर्ते निरागस, निष्पाप मुलींवरील बलात्कार करणाऱ्यांना वाचवतात, त्यांचे पदाधिकारी 'हिट अँड रन' प्रकरणांना दडपून टाकतात. गुंड मंत्रालयात फिरतात आणि नेत्यांसोबत सेल्फी घेतात. या सरकारमध्ये लाज नावाची गोष्ट उरली आहे का?", असा सवाल देखील वर्षा गायकवाड यांनी केला आहे.

काय अपेक्षा ठेवणार?

'बाबा सिद्दीकी तुमचे सहकारी होते, तुमच्या सरकारचा भाग होते. तुम्ही त्यांचं रक्षण करू शकला नाही, तर सर्वसामान्य माणूस तुमच्याकडून काय अपेक्षा ठेवणार? ही सरकार एकामागून एक हत्या आणि गुन्हे होताना बघतेय आणि काहीच करत नाही. गृहमंत्र्यांनी त्वरित राजीनामा द्यावा आणि ते देत नसतील, तर मुख्यमंत्र्यांनी त्यांचा राजीनामा मागितला पाहिजे', असे वर्षा गायकवाड यांनी म्हटले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT