Nana Patole, Chandrakant Patil
Nana Patole, Chandrakant Patil sarkarnama
मुंबई

'पाटलांची लोकांना 'मसनात' पाठवण्याची भाषा मग्रुरीची; भाजपचे लोकच असे बोलू शकतात!'

सरकारनामा ब्यूरो

मुंबई : ओबीसींच्या (OBC Reservation) राजकीय आरक्षणासाठी भाजपने (BJP) मंत्रालायावर काढलेला मोर्चा हे निव्वळ ढोंग आहे. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या नेतृत्वाखालील भाजपचे सरकार राज्यात असतानाच ओबीसींचे राजकीय आरक्षण संपुष्टात आणण्याची सुरुवात झाली. त्याला केंद्रातील भाजप सरकारने साथ दिली हे उघड सत्य आहे. त्यामुळे भाजपला ओबीसींच्या आरक्षणावर बोलण्याचा काहीही अधिकार नाही, असा हल्लाबोल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी केला.

आरक्षण संपवणे हेच भाजप व त्यांची मातृसंस्था आरएसएसचा अजेंडा असून मंत्रालयावरील भाजपचा मोर्चा म्हणजे केवळ 'नौटंकी' आहे. ओबीसींना आरक्षण मिळावे असे भाजप नेत्यांना वाटत असेल तर त्यांनी पंतप्रधान कार्यालयावर मोर्चा काढावा, असे पटोले म्हणाले. यासंदर्भात बोलताना पटोले म्हणाले की, मोर्चावेळी भाजप नेत्यांनी केलेली विधाने ही अत्यंत हास्यास्पद व बालिश होती. सत्तेच्या लालसेने पछाडलेल्या चंद्रकांत पाटील यांनी लोकांना 'मसनात' पाठवण्याची भाषा केली. ही मग्रुरी असून भाजपचे लोकच अशी भाषा वापरू शकतात. ओबीसी आरक्षण संपुष्टात येण्याची सुरुवात झाली, तीच मुळी २०१७ मध्ये, असे पटोले म्हणाले.

नागपूर जिल्हा परिषदेच्या निवडणुका फडणवीस सरकारने एक साधे परिपत्रक काढून पुढे ढकलल्या आणि प्रकरण चिघळले. नंतर हे प्रकरण न्यायालयात गेले त्यादरम्यान ओबीसी आरक्षण वाचावे म्हणून फडणवीस सरकारने कोणतीही हालचाल केली नाही. पाच वर्षे फडणवीस सरकारने झोपा काढल्या. आता मात्र ओबीसी आरक्षणाचे खापर महाविकास आघाडीवर फोडू पहात आहेत.

ओबीसींच्या राजकीय आरक्षणाशिवाय निवडणुका घेऊ नयेत हीच काँग्रेस पक्षाची भूमिका आहे. त्यासाठी महाविकास आघाडी सरकारही प्रयत्नशील आहे. विधानसभेचा अध्यक्ष असताना मी स्वत: जातीनिहाय जनगणना करावी असा ठराव मांडून तो संमत करून घेतला. जातीनिहाय जनगणना झाली तर असे वाद निर्माणच होणार नाहीत. मात्र, केंद्रातील भाजप सरकार त्यावर निर्णय घेत नाही. ओबीसी आरक्षणाच्या आजच्या परिस्थितीस भाजपच जबाबदार, असल्याचेही पटोले म्हणाले.

धनगर समाजाला पहिल्याच मंत्रिमंडळ बैठकीत आरक्षण देण्याचे आश्वासन देणारा व नंतर पाच वर्ष त्यांना झुलवत ठेवणारा पक्षही भाजपच आहे. ओबीसींना राजकीय आरक्षण मिळावे ही भाजप सोडता सर्व राजकीय पक्षांची भूमिका आहे. ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा खरा मारेकरी भाजपच असून आता आंदोलन करत 'मगरीचे अश्रू' ढाळत आहे, असा टोलाही पटोले यांनी लगावला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT