Nana Patole
Nana Patole Sarkarnama
मुंबई

Nana Patole Warning : भाजप-शिंदे गटासोबत युती कराल तर... : नाना पटोलेंचा कडक इशारा

सरकारनामा ब्यूरो

मुंबई : काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाची राज्यात महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) आहे. राज्यातील सर्व प्रकारच्या निवडणुका महाविकास आघाडीच्या माध्यमातूनच लढवण्याचा पक्षाचा निर्णय आहे. परंतु काही ठिकाणी शिंदे गट आणि भारतीय जनता पक्षाशी (BJP) काँग्रेसने युती केल्याच्या तक्रारी येत आहेत, हे पक्षशिस्तीचे उल्लंघन आहे. अशी युती करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल, असा इशारा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी दिला. (Congress workers should not alliance with BJP and Shinde group : Nana Patole)

राज्यात सध्या कृषी उत्पन्न बाजार समिती, खरेदी-विक्री संघाच्या निवडणुकीसह सहकार क्षेत्रातील सर्व प्रकारच्या निवडणुका होत आहेत. या निवडणुकीत स्थानिक पातळीवर वेगळा निर्णय घेऊ नये. त्यासंदर्भात सर्व जिल्हा व तालुका स्तरावरही सूचना देण्यात आलेल्या आहेत. कोणत्याही प्रकारे पक्षशिस्तीचे उल्लंघन केलेले खपवून घेतले जाणार नाही, हे लक्षात ठेवा. काँग्रेस पक्ष तसेच महाविकास आघाडी अबाधित राहिल, याकडे सर्वांनी लक्ष द्यावे, असेही काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी बजावले आहे.

प्रदेश काँग्रेसने यासंदर्भात एक पत्र जाहीर केले आहे. त्यात म्हटले आहे की, राज्यात होऊ घातलेल्या कृषी उत्पन्न बाजार समित्या आणि खरेदी विक्री संघाच्या निवडणुकीसह सहकार क्षेत्रातील सर्व प्रकारच्या निवडणुका महाविकास आघाडीतील घटक पक्षांना सोबत घेऊनच लढवाव्यात, असे आपणास या पत्राद्वारे सूचित करण्यात येते. यापूर्वीही तशी सूचना केलेली आहे.

राज्यात काही ठिकाणी शिंदे गट आणि भारतीय जनता पक्षासोबत युती करून या सहकार क्षेत्रातील संस्थांच्या निवडणुका लढविल्या जात आहे, अशा तक्रारी प्रदेश काँग्रेस कमिटीकडे आलेल्या आहेत. पण, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या आदेशानुसार सर्वांना सूचित करण्यात येते की, भाजप आणि शिंदे गटासोबत कोणत्याही प्रकारची युती करण्यात येऊ नये.

स्थानिक पातळीवर अशा प्रकारची युती करण्यात आली असेल तर ती उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या तारखेपर्यंत तोडण्यात यावी. तसे, न केल्यास संबंधितांवर कारवाई करण्यासंदर्भातील अहवाल तातडीने प्रदेश काँग्रेस कमिटीकडे पाठविण्यात यावा, अशी सूचनाही प्रदेश काँग्रेसकडून करण्यात आली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT