BandaTatya Karadkar
BandaTatya Karadkar 
मुंबई

कोरोनात वारकऱ्यांनी साथ दिली; आतातरी मंदीरे खुली करा : बंडातात्या कऱ्हाडकर

सरकारनामा ब्यूरो

फलटण : सोशल डिस्टन्सिंग पाळून व गर्दी कमी करून विवाह सोहळे होत आहेत. सर्व शासकीय कार्यालये, दळणवळण, बाजारपेठांसह सर्व सुरू झाले आहे. असे असताना धार्मिक कार्यक्रमांनाच शासन का परवानगी देत नाही. राज्यभर या सर्वांवर बंदी घालून शासन नेमके काय साध्य करत आहे, असा प्रश्न उपस्थित करून शासनाने मंदिरे खुली करून कीर्तन, प्रवचन, भजनांना परवानगी दिली तर अध्यात्मिक प्रबोधनाबरोबर कोरोनाविषयीही प्रबोधन या माध्यमातून खूप चांगल्या करता येईल, अशी अपेक्षा ज्येष्ठ कीर्तनकार बंडातात्या कऱ्हाडकर यांनी व्यक्त केली आहे. 

महाराष्ट्र ही संतांची भूमी असून, येथ कीर्तन, प्रवचन, भजनादी कार्यक्रमांतून होणारे सर्वसामान्यांचे प्रबोधन अधिक प्रभावी आणि समाजहिताला प्राधान्य देणारे ठरत असल्याचे प्रशासनाला ज्ञात आहे. यापूर्वी स्वच्छता अभियान, वृक्षारोपण व संवर्धन किंवा ग्रामगीतेमधून नागरी सुविधा, ग्रामीण विकासाचे प्रबोधन तर वर्षानुवर्षे झाले असताना राज्यभर या सर्वांवर बंदी घालून शासन नेमके काय साध्य करत आहे, असा सवाल कऱ्हाडकर यांनी उपस्थित केला आहे. 

कोरोनाचा वाढता प्रभाव रोखण्यासाठी प्रशासनाने आषाढी, चैत्री वारी बंद केली. सर्व मंदिरे बंद ठेवली. मात्र, लग्न सोहळ्यांना संख्येची मर्यादा घालून परवानगी देत आहे. तद्वत मंदिरे खुली केली, कीर्तन, प्रवचन, भजनांना परवानगी दिली तर अध्यात्मिक प्रबोधनाबरोबर कोरोनासंबंधी योग्य प्रबोधन त्या माध्यमातून मास्क, सॅनिटायझर वापर, सामाजिक अंतर, गर्दी टाळणे या बाबी कीर्तनकार, प्रवचनकार सर्वसामान्यांना खूप चांगल्या प्रकारे समजावून देतील, याची ग्वाही श्री. कऱ्हाडकर यांनी दिली आहे. 

महाराष्ट्र ही अध्यात्मिक भूमी आहे. पंढरीचा पांडुरंग हे वारकरी सांप्रदायाचे आद्यपीठ आहे, तर संतांची तीर्थक्षेत्र ही विद्यापीठे आहेत. याच क्षेत्रावर सामाजिक अंतर राखून भजन, पूजन, कीर्तन, प्रवचन आदी धार्मिक कार्यक्रम सुरू करणे गरजेचे आहे. शासनाने चैत्री व आषाढी वारीवर बंदी घातली त्यावेळी संपूर्ण जगावर कोरोनाचे महासंकट आल्यामुळे वारकऱ्यांनीही शासनाला साथ केली, असेही श्री. कऱ्हाडकर यांनी म्हटले आहे.  

 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT