Shiv Sena, BJP, Congress, NCP Latest Marathi News sarkarnama
मुंबई

विधान परिषदेची दहावी जागा कुणाला? गुप्त मतदानामुळे आघाडीसमोर आव्हान...

राज्यात राज्यसभेच्या सहाव्या जागेवरून रंगत वाढलेली असताना विधान परिषदेची दहावी जागा कुणाला मिळणार याचीही उत्सुकता वाढली आहे.

सरकारनामा ब्युरो

मुंबई : राज्यात राज्यसभेच्या सहाव्या जागेवरून रंगत वाढलेली असताना विधान परिषदेची दहावी जागा कुणाला मिळणार याचीही उत्सुकता वाढली आहे. आकड्यांचे गणित पाहता दहाव्या जागेसाठी पहिल्या पसंतीच्या आवश्यक मतांचा कोटा कोणत्याच पक्षाकडे नाही. तसेच या निवडणुकीत भाजपच्या (BJP) दोन विद्यमान आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता आहे. गुप्त मतदानामुळे दहाव्या जागेसाठी या निवणुकीत घोडेबाजार होऊ शकतो, अशी चर्चा आहे. ((Legislative Council Election Latest Marathi News)

राज्यात विधान परिषदेच्या दहा जागांसाठी मतदान होणार आहे. भाजपचे प्रवीण दरेकर, सदाभाऊ खोत, सुजितसिंह ठाकूर, प्रसाद लाड, विनायक मेटे यांची मुदत संपत आहे. तर रामनिवास सत्यनारायण सिंह यांचे नुकतेच निधन झाले आहे. शिवसेनेचे (Shiv Sena) सुभाष देसाई, दिवाकर रावते या दोन आमदारांची तर राष्ट्रवादीचे (NCP) संजय दौंड यांचीही मुदत संपत आहे. तर एक जागा रिक्त आहे.

दहाव्या जागेवर काँग्रेसचा दावा?

संख्याबळानुसार काँग्रेसची (Congress) एक जागा सहज निवडून येऊ शकते. त्यानंतरही पहिल्या पसंतीची 15 मते उरत आहेत. भाजपसह इतर पक्षांच्या तुलनेत ही मतं सर्वाधिक आहेत. त्यामुळे दहाव्या जागेवर महाविकास आघाडीत काँग्रेसकडून दावा केला जाऊ शकते. ही जागा निवडून आणण्यासाठी काँग्रेसला 10 ते 12 मतांची जुळवाजुळव करावी लागेल.

असं आहे विधान परिषदेचं गणित?

विधान परिषदेवर निवडून येण्यासाठी 27 मतांची आवश्यकता आहे. भाजप आणि मित्रपक्ष मिळून 113 संख्याबळ होते त्यामुळे भाजपच्या चार जागा सहज निवडून येऊ शकतात. शिवसेना व राष्ट्रवादीचे प्रत्येकी दोन आमदार विधान परिषदेत जातील. तर काँग्रेसला एक जागा मिळेल. त्यानंतरही त्यांच्याकडे पहिल्या पसंतीची मतं शिल्लक राहत असून दुसऱ्या उमेदवारासाठी त्यांना 12 मतांची जुळवाजुळव करावी लागणार आहे.

भाजपमधील दोघांचा पत्ता कट

भाजपमधील सहा सदस्य निवृत्त होत असून संख्याबळानुसार चौघेच निवडून येऊ शकतात. त्यामुळे दोन जागा कमी होणार आहेत. त्यामध्ये प्रविण दरेकर आणि प्रसाद लाड यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे. तर खोत आणि मेटेंना पुन्हा संधी मिळणार की नाही, याबाबत स्पष्टता नाही. माजी मंत्री पंकडा मुंडे, चित्रा वाघ यांच्याही नावांची जोरदार चर्चा सुरू आहे.

शिवसेनेकडून देसाईंना संधी?

शिवसेनेकडून मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचे निकटवर्तीय सुभाष देसाई यांना पुन्हा संधी दिली जाऊ शकते. ते मागील सात वर्षांपासून उद्योगमंत्री आहेत. त्यांना आणखी एक संधी मिळेल. तर रावते यांना यावेळी मंत्रिमंडळातही स्थान देण्यात आलेले नाही. त्यामुळे त्यांना पुन्हा संधी मिळणार की नाही, याबाबत तर्कवितर्क लढवले जात आहेत.

राष्ट्रवादीकडून निंबाळकर?

राष्ट्रवादीकडून विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांना पुन्हा संधी दिली जाईल. राष्ट्रवादीतील ते वजनदान नेते मानले जातात. पण दुसरी जागेसाठी कुणाचं नाव पुढे येणार याकडे लक्ष लागले आहे. काँग्रेसचा एकही उमेदवार निवृत्त होत नसला तरी या जागेवर कुणाला संधी मिळणार याबाबत उत्सुकता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT