Ramdas Kadam Sarkarnama
मुंबई

Azad Maidan Dasara Melava : महाराष्ट्राचा पहिला नालायक मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरेंची नोंद, रामदास कदमांची जहरी टीका

Sachin Fulpagare

Eknath Shinde Dasara Melava 2023 : शिवसेना (शिंदे गट) नेते रामदास कदम यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जहरी शब्दांत टीका केली. उद्धव साहेब तुम्हाला कळले पाहिजे. शिवसेनेशी कुणी बेईमानी केली. शिवसेनाप्रमुखांच्या पाठीत खंजीर कुणी खुपसला. गद्दार तुम्ही आहात, बेईमान तुम्ही आहात.

महाराष्ट्राच्या इतिहासात आपल्या बापाच्या पाठीत खंजीर खुपसून काँग्रेसबरोबर जाणारा पहिला नालायक मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरेंची नोंद होईल, असा जिव्हारी लागणारा शाब्दिक हल्ला रामदास कदम यांनी केला. आझाद मैदानावर शिंदे गटाच्या दसरा मेळाव्यात ते बोलत होते.

रामदास कदम म्हणाले की, चातक पक्षी जसा पावसाची वाट पाहतो. तसे शिवसेनाप्रमुखांचे विचार ऐकायला संपूर्ण महाराष्ट्र यायचा. या सभेत शिवसेनाप्रमुख राम मंदिराविषयी बोलत होते. काश्मीरविषयी ते बोलत असत, पाकिस्तान बाळासाहेबांना भीत होता.

त्या शिवाजी पार्कावर उद्धवजी बोलत असतील, तर ते फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्याविषयी बोलत असतील. उद्धव ठाकरे म्हणत की, राम मंदिर बनाएंगे, तारीख नही बताएंगे असे म्हणायचे.

आता राम मंदिरही झाले आहे, उद्घाटनाची तारीख ही जाहीर झाली. बाळासाहेबांचे स्वप्न मोदींनी पूर्ण केले. राम मंदिर पूर्ण केले. साहेब दोन-दोन हातांनी मोदीजींना आणि शाहांना आशीर्वाद देत असतील. त्यांचे सुपुत्र हे कुपुत्र म्हणण्याच्या लायकीचे आहेत.

काश्मीरमधून कलम ३७० हटवण्याची हिंमत कोणत्याच पंतप्रधानांची नव्हती. परंतु, मोदी आणि शाह यांनी ही हिंमत केली. काश्मीरमध्ये तिरंगा डौलाने फडकवणाऱ्या मोदींना सलाम करण्यासाठी मी इथे आलो आहे. शिवसेनाप्रमुखांच्या आत्म्याला आज शांती लाभली असेल. मोदींनी चंद्रयान मोहीम यशस्वी केली. या देशाला मोदी यांनी मोठे केले. परंतु, उद्धव ठाकरे हे सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत मोदी- शाह आणि शिंदेंवर टीका करतात.

जरांगेंना तज्ज्ञांशी बोलण्याचा सल्ला

या वेळी त्यांनी संजय राऊत यांच्यावरही टीका केली. या वेळी मराठा आरक्षणासाठी आंदोलन करताना शिवसेनेचे मुखपत्र 'सामना' दैनिकातील व्यंगचित्राचा दाखला त्यांनी दिला. मराठा आरक्षणाबाबत त्यांनी जरांगे पाटील यांना तज्ज्ञांचे मत जाणून घेण्याचा सल्ला दिला.

आम्ही मराठा समाजाच्या मागे आहोत. भावनेच्या भरात वाहून जाऊ नका, असेही ते म्हणाले. कोकणातील परिस्थिती थोडी वेगळी आहे म्हणून मी वक्तव्य केले होते. त्याचा गैरसमज करून घेऊ नका. महाराष्ट्रात कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही, याचीही दक्षता घेतली पाहिजे.

उद्धव साहेब तुम्हाला थोडेसे कळले पाहिजे, शिवसेनेशी बेईमानी केली कोणी, शिवसेना प्रमुखांच्या पाठीत खंजीर खुपसलं कोणी. गद्दार तुम्ही आहात, बेईमान तुम्ही आहात. आपल्या वडिलाच्या पाठीत खंजीर खुपसून काँग्रेसबरोबर जाणारा पहिला नालायक मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांची इतिहासात नोंद होईल, अशा शब्दांत टीका केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT