rajesh tope
rajesh tope sarkarnama
मुंबई

राज्य मास्कमुक्त कधी होणार ? आरोग्यमंत्री टोपेंनी दिलं उत्तर..

सरकारनामा ब्युरो

मुंबई : राज्यात कोरोनाचे निर्बंध मोठ्या प्रमाणात शिथिल करण्यात आले आहेत. काही प्रमाणात हे निर्बंध कायम आहेत. मात्र, मास्क मुक्तीचा निर्णय अद्याप घेण्यात आलेला नाही. अन्य देशात अजूनही कोरोना पूर्णतः नियंत्रणात आलेला नाही. महाराष्ट्रात मास्कमुक्ती (mask)होणार का? हा प्रश्न अनेकांचा मनात आहे, याला राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे (rajesh tope)यांनी उत्तर दिलं आहे.

राजेश टोपे म्हणाले, ''डेल्टा, डेल्टा प्लस, ओमिक्रॉन यानंतर आता डेल्टाक्रॉन व्हायरस आला आहे. त्याचेही काही रूग्ण महाराष्ट्रात आहेत. काळजी कशी घेतली पाहिजे? जगात काय चाललं आहे? आपल्या देशात काय चाललं आहे? या सगळ्याचा अभ्यास टास्क फोर्सकडून केला जातो आहे त्यानंतर आपण निर्णय घेत असतो,''

''जगभरात कोरोनाचे पूर्ण उच्चाटन होईल. तोपर्यंत तरी मास्कपासून मुक्ती मिळणार नाही. पण, मुख्यमंत्री आणि टास्क फोर्स याना योग्य वाटल्यास ते तसा निर्णय घेऊ शकतील,'' असे राजेश टोपे यांनी स्पष्ट केले.

''अगदीच मास्क घालायचा नाही हे योग्य नाही. गर्दीच्या ठिकाणी जात असू तिथे मास्क वापरणं आवश्यक आहे. जर आपल्याला कोणताही संसर्ग झाला असेल तर त्यापासून आपला आणि इतरांचा बचाव होऊ शकतो. आपण तूर्तास तरी मास्कमुक्तीचा कोणताही विचार केलेला नाही,'' असे टोपे म्हणाले.

''आपल्या देशात कोरोना आटोक्यात आलेला आहे. मात्र दुसऱ्या देशांमध्ये कोरोनाची चौथी लाटही आलेली आहे. त्याचे जे काही परिणाम आपण पाहतो आहोत ते पाहता मास्कमुक्त राज्य करणं हे थोडं धाडसाचं ठरेल. ज्यावेळी तशी परिस्थिती वाटेल तेव्हा मुख्यमंत्री त्या संदर्भातली घोषणा करतील.'' असे टोपे यांनी स्पष्ट केलं.

''गुढीपाडव्याची मिरवणूक किंवा इतर गोष्टींना संमती देण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घेतील. अशा प्रकारच्या मागण्याही समोर आल्या आहेत. मुख्यमंत्री याबाबत विचारविनिमिय करून योग्य तो निर्णय घेतील. त्याच्या निर्णयाची वाट आपण बघू ,'' असे टोपे म्हणाले.

गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर राज्य निर्बंधमुक्त होईल का या प्रश्नाला उत्तर देताना टोपे म्हणाले, ''सध्या राज्यात बऱ्यापैकी अनेक गोष्टी, संस्था, आस्थापना सुरू करण्यात आल्या आहेत. मास्कबाबत आपण कोणतीही शिथिलता दिलेली नाही. मात्र इतर अनेक गोष्टी सुरू झाल्या आहेत. बाजारपेठा फुलल्या आहेत, शहरांमध्ये गर्दीही होते आहे. वाहतूक सेवांमध्येही गर्दी होते आहे. त्यामुळे आपण निर्बंध शिथीलीकरण झालेलं आहेच. भारत सोडून इतर काही प्रमुख देशांमध्ये कोरोनाची चौथी लाट मोठ्या प्रमाणावर पाहण्यास मिळते आहे. तरीही आपल्याकडे कठोर असे म्हटले जावेत असे निर्बंध आजच्या घडीला नाहीत.''

देशात आणि राज्यात कोरोनाची तिसरी लाटही आता बऱ्यापैकी आटोक्यात आली आहे. रूग्णांचं प्रमाण कमी झालं आहे. ३१ मार्चपासून देशभरातले निर्बंधही संपुष्टात येणार आहेत. मास्क आणि सोशल डिस्टन्सिंग हे दोन नियम मात्र असणार आहेत, असंही केंद्र सरकारकडून सांगण्यात आलं आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT