Devendra Fadnavis  Sarkarnama
मुंबई

कोश्यारींचा करेक्ट कार्यक्रम होणार? फडणवीस म्हणतात, उदयनराजेंच्या भावना योग्य ठिकाणी पोहचल्या

Devendra Fadnavis News : उदयनराजेंच्या पाठिशी आम्ही असल्याचं फडणवीसांनी सांगितलं

सरकारनामा ब्यूरो

Devendra Fadnavis News : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्याच्या पार्श्वभूमीवर राज्यभरातून नाराजी व्यक्त करण्यात येतेय. आज उदयनराजेंनी पत्रकार परिषद घेत राज्यपालांच्या विरोधात भूमिका घेत भाजपला खडेबोल सुनावले. यावर प्रतिक्रिया देत ''उदयनराजे यांच्या भावना योग्य ठिकाणी पोहोचल्या आहेत”, असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं.

कोश्यारींच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर उदयनराजेंनी (Udayanraje Bhosale) सत्ताधारी भाजपाला (BJP) खडे बोल सुनावले. ''शिवरायांचा होत असणारा अपमान बघण्यापेक्षा मेलो असतो तर बरं झालं असतं'' असं म्हणत उदयनराजे भावूक झाले. राज्यपालांच्या वादग्रस्त वक्तव्याबाबत अॅक्शन घेतली नाही तर तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेण्याचा अधिकार नाही, असा इशारा देत त्यांनी भाजपला सुनावलं.

त्यानंतर देवेंद्र फडणवीसांनी यावर प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, ''उदयनराजेंच्या पाठिशी आम्ही आहोत. छत्रपतींचे वंशज हे कधीही हतबल होऊ शकत नाहीत. ते भावनेतून बोलले असले तरी महाराष्ट्र आणि देश त्यांच्या पाठिशी आहे. उदयनराजे यांच्या भावना योग्य ठिकाणी पोहोचल्या आहेत. शेवटी राज्यपाल हे पद संविधानिक पद असतं. ते सरकारच्या हाती नसतं. सरकार त्यात काही करु शकत नाही'', असं फडणवीस म्हणाले.

''राज्यपालांवर कारवाई करण्याचे सर्व अधिकार राष्ट्रपतींचे असतात. त्यामुळे मला असं वाटतं की, उदयन महाराज हे समजून घेतील. पण त्यांच्या भावनेच्या पाठिशी आम्ही ठामपणे उभे आहोत. छत्रपती शिवाजी महाराजांपेक्षा मोठं प्रेरणास्त्रोत दुसरं कोणी असू शकत नाही. आमच्या सगळ्यांचे प्रेरणास्त्रोत तेच आहेत. महाराष्ट्र आणि देशाचे आदर्श तेच आहेत'', असं फडणवीसांनी सांगितलं.

दरम्यान, राज्यपालांनी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर त्यांना पदावरून हटवण्याची मागणी उदयनराजेंनी केलीय. एवढंच नाही तर कारवाई झाली नाही तर येत्या ३ डिसेंबरला रायगडावर आंदोलन करण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला. आता फडणवीसांनी देखील उदयनराजे यांच्या भूमिकेला पाठिंबा दिला. त्यामुळे आता राज्यपाल कोश्यारींना (Bhagat Singh Koshyari) पदावरून हटवण्यात येणार का? हे येणाऱ्या काळातच समजणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT