Shrikant Bhartiya and Devendra Fadnavis  Sarkarnama
मुंबई

फडणवीसांनी एका 'ओएसडी'ला विधानसभेवर पाठवलं अन् दुसऱ्याला आता विधान परिषदेची लॉटरी

विधान परिषदेच्या यादीवर फडणवीसांचाच वरचष्मा

सरकारनामा ब्युरो

मुंबई : भाजपने विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी पाच उमेदवारांची घोषणा केली आहे. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, प्रसाद लाड, माजी मंत्री राम शिंदे, श्रीकांत भारतीय आणि उमा खापरे यांना विधान परिषदेची संधी देण्यात आली आहे. यातील भारतीय यांच्या नावाने सगळ्याचं लक्ष वेधून घेतलं आहे. कारण भारतीय हे देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री असताना त्यांचे ओएसडी होते. याआधी फडणवीसांना एका ओएसडीला विधानसभेवर पाठवलं आहे. (Legislative Council Election News)

देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे मुख्यमंत्री असताना भारतीय आणि अभिमन्यू पवार हे त्यांचे ओएसडी होते. त्यातील पवार हे आधीच आमदार झाले आहेत. आता भारतीय यांना विधान परिषदेची लॉटरी लागली आहे. श्रीकांत भारतीय हे भाजपचे (BJP) प्रदेश सरचिटणीस आहेत. याचबरोबर त्यांच्यावर संघटन मंत्री ही अतिरिक्त जबाबदारी आहे. याचबरोबर ते भाजपच्या किसान मोर्चाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीचे सदस्य आहेत. शिवसेनेशी पंगा घेणाऱ्या नेत्यांमध्ये त्यांचा समावेश होतो. राज्यातील 2014 च्या विधानसभा निवडणुकीत ते भाजपच्या वॉररुमचे प्रमुखही होते.

फडणवीसांचे दुसरे ओएसडी अभिमन्यू पवार हे विधानसभेवर निवडून आले आहेत. ते औसा मतदारंसघातून निवडून आले आहेत. आता फडणवीसांचा एक ओएसडी विधानसभेत आणि दुसरा विधान परिषदेत दिसण्याची शक्यता आहे. मात्र, ज्येष्ठ नेत्यांना डावलून भारतीय यांना संधी देण्यात आल्यानं पक्षातून नाराजीचा सूर उमटत आहे. असे असले तरी विधान परिषदेच्या यादीवर फडणवीसांचे वर्चस्व असल्याचं समोर आलं आहे.

भाजपच्या केंद्रीय कार्यालयाकडून महाराष्ट्रातील पाच उमेदवारांच्या नावाची घोषणा करण्यात आली. पंकजा मुंडे यांनी आपण विधान परिषदेसाठी इच्छुक असल्याचे म्हटले होते. त्यामुळे त्यांच्या नावाची जोरदार चर्चा होती. तसेच उपाध्यक्ष चित्रा वाघ यांचं नावही चर्चेत होतं. पण दोघींनाही संधी देण्यात आलेली नाही. पक्षाच्या महिला मोर्चाच्या अध्यक्षा उमा खापरे यांना लॉटरी लागली आहे. त्यांच्यासोबत पक्षाचे सरचिटणीस श्रीकांत भारतीय यांनाही संधी दिली आहे. दरेकर, लाड व शिंदे यांच्या नावांवर आधीच शिक्कामोर्तब झाल्याचे मानले जात होते. तिघेही नेते फडणवीसांचे निकटवर्ती मानले जातात.

परिषदेसाठी 9 जून अर्ज भरण्याची अखेरची तारीख असल्याने आज यादी जाहीर करण्यात आली आहे. विधान परिषदेसाठी 20 जूनला निवडणूक होणार आहे. विधान परिषदेवर निवडून यायचे असेल तर 27 मतांची आवश्यकता असणार आहे. विधानसभेतील संख्याबळानुसार भाजपचे दोन सदस्य कमी निवडून येतील. भाजप आणि मित्रपक्ष मिळून संख्याबळ 113 होत आहेत. त्यामुळे भाजपच्या चार जागा निवडून येऊ शकतात. राष्ट्रवादी काँग्रेसचे 53, शिवसेना 56 आणि कॉंग्रेसचे 44 आमदार आहेत. दरम्यान, सभापती रामराजे निंबाळकर यांच्यासह सुभाष देसाई, दिवाकर रावते (शिवसेना), प्रवीण दरेकर, सदाभाऊ खोत, प्रसाद लाड, विनायक मेटे, सुजितसिंह ठाकूर, आर. एस. सिंह (सर्व भाजप), संजय दौंड (राष्ट्रवादी) हे दहा सदस्य निवृत्त होणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT