jp nadda | narendra modi |amit shah |devendra fadnavis sarkaranama
मुंबई

Devendra Fadnavis : फडणवीसांना सरकारमधून पक्षश्रेष्ठी 'मोकळे' करणार? दिल्लीत हालचालींना वेग

Akshay Sabale

Mumbai News, 6 June : लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात '440' चा करंट बसल्यानं प्रदेश भाजपमध्ये भूकंप झाला. या अपयशाची जबाबदारी स्वीकारून देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रिपदाच्या जबाबदारीतून मुक्त करण्याची विनंती पक्षश्रेष्ठींना करणार असल्याचं बुधवारी जाहीर केलं.

त्यानंतर भाजप आणि महायुतीत गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली असून फडणवीसांनी ( Devenrdra Fadnavis ) राजीनामा देऊ नये, अशी गळ प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह प्रदेश सुकाणू समितीच्या नेत्यांनी घातली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही पराभवाची जबाबदारी सर्व घटक पक्षांची असल्याचं म्हटलं आहे.

त्याच पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस दिल्ली दौऱ्यावर जात आहेत. तिथे फडणवीस पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्याशी चर्चा करून सरकारमधून बाहेर पडत पक्षसंघटनेत काम करण्याची इच्छा व्यक्त करतील. पण, फडणवीसांची मागणी पक्षश्रेष्ठींकडून मान्य होईल का? हा देखील प्रश्न उपस्थित केला जात आहे.

त्यासह फडणवीसांनी उपमुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देऊन पक्षसंघटनेत काम करण्याची इच्छा पक्षश्रेष्ठींच्या आदेशानुसार केल्याची चर्चांना रंगली होती. पण, या चर्चां दिल्लीतील एका नेत्यानं फेटाळल्या आहेत. "पक्षश्रेष्ठींकडून फडणवीसांना पद सोडण्याचा कोणताही आदेश आला नाही. त्यांनी स्वत:हून ती भूमिका घेतली आहे. मात्र, ती मान्य केली जाण्याची शक्यता नाही," असं भाजप नेत्यानं एका वृत्तपत्राशी संवाद साधताना स्पष्ट केलं आहे.

सामूहिक जबाबदारी

लोकसभा निवडणुकीतील खराब कामगिरी ही महायुतीतमधील तिन्ही मोठ्या पक्षांची सामूहिक जबाबदारी असल्याची प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. "निवडणूक आम्ही तीन पक्षांनी एकत्रित लढली होती. त्यामुळे आलेले अपयश ही आमची सामूहिक जबाबदारी आहे.

या पराभवाच्या कारणांचा आम्ही आढावा घेऊ. त्यामुळे राजीनामा देण्याच्या फडणवीसांनी वक्तव्याबाबत मी त्यांच्याशी लवकरच चर्चा करेन. आम्ही यापूर्वीही एकत्रित काम केलं आहे आणि भविष्यातही एकत्रितच काम करू," असं एकनाथ शिंदेंनी म्हटलं.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT