Mumbai municipal finance : मुंबई महापालिकेत महायुतीची सत्ता आल्यानंतर बुधवारी पहिलाच अर्थसंकल्प सादर करण्यात आला. तब्बल ८० हजार कोटी रुपयांच्या या अर्थसंकल्पात मुंबईकरांसाठी अनेक घोषणा करण्यात आल्या आहेत. पण राजकीय वर्तुळात सर्वाधिक चर्चा एका निर्णयाची होत आहे. मुंबईत सत्तापालट झाल्यानंतर महापालिका प्रशासनाने महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे.
महापालिका निवडणुकीच्या प्रचारादरम्यान सुमारे ८१ हजार कोटींच्या ठेवीचा मुद्दा चांगलाच गाजला होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना महापालिकेच्या ठेवीचा मुंबईकरांना फायदा होत नसेल तर त्याच्या रिसीट चाटायच्यात का?, असे म्हटले होते. त्याला ठाकरेंनीही जोरदार प्रत्युत्तर दिले होते.
महापालिकेत सत्ताबदल होताच प्रशासनाने ८१ हजार ४४९ कोटी ३२ लाख रुपयांच्या शिल्लक ठेवींपैकी तब्बल ३६ हजार ६२३ कोटी ९ लाख रुपयांच्या ठेवी मोडण्याचा निर्णय घेतल्याचे समोर आले आहे. विविध विकासकामांसाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे अर्थसंकल्पात म्हटले आहे. उर्वरित ४४ हजार ८२६ कोटी २३ लाख रुपयांच्या ठेवी राखीव असल्याने त्या मोजता येणार नाहीत.
निवडणुकीच्या प्रचारातही ठाकरेंनी प्रशासनाकडून ठेवी मोडण्यात येत असल्याचा आरोप केला होता. तसेच भाजपची सत्ता आल्यास आणखी ठेवी मोडल्या जातील, असा दावाही ठाकरेंनी केला होता. ठाकरेंचा हा दावा काही दिवसांतच खरा ठरला आहे. मुंबई महापालिकेत तब्बल २५ वर्षे ठाकरेंच्या शिवसेनेची सत्ता होती.
मुंबई महापालिकेकडे 2021-22 मध्ये 91 हजार 69 कोटी रुपयांच्या ठेवी होत्या. मुंबईत प्रशासक राज आल्यानंतर या ठेवी मोडण्यास सुरूवात झाली होती. आतापर्यंत जवळपास 11 हजार कोटींच्या ठेवी मोडण्यात आल्या होत्या. सध्या ८१ हजार कोटी रुपयांच्या ठेवी असून त्यापैकी ३६ हजार कोटींच्या ठेवी मोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
महापालिकेतील विरोधी पक्षनेते किशोरी पेडणेकर यांनी यावरून भाजपवर टीका केली आहे. आतापर्यंत किती ठेवी कोणत्या कामांसाठी मोडण्यात आल्या याची माहिती पारदर्शकपणे जाहीर करावी, अशी मागणी पेडणेकर यांनी केली आहे. त्यामुळे आता महापालिकेच्या या निर्णयावरून राजकारण तापण्याची शक्यता आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.