Dilip Walse Patil
Dilip Walse Patil  Sarkarnama
मुंबई

भोंग्याचा डाव उलटणार? राज्य सरकारनं केली मोदी सरकारचीच कोंडी

सरकारनामा ब्युरो

मुंबई : राज्यात भोंग्यांचा विषयावरुन राजकारण तापलं असतानाच आज राज्य सरकारने सह्याद्री अतिथीगृहावर सर्वपक्षीय बैठक बोलावली. या सर्वपक्षीय बैठकीला शिवसेना (Shivsena), भाजप (BJP), राष्ट्रवादी कॉंग्रेस (NCP), कॉंग्रेस (Congress) यांच्यासह भाजप आणि मनसे नेत्यांनाही आमंत्रित करण्यात आलं होतं. या बैठकीला भाजपने दांडी मारली. या बैठकीत आता राज्य सरकारने मोदी सरकारचीच कोंडी करण्याची खेळी खेळली आहे.

या सर्वपक्षीय बैठकीत भोंगे न उतरवण्यावर एकमत झाले आहे. याचवेळी या मुद्दा केंद्र सरकारच्या अखत्यारीतील असल्याची गुगली सरकारने टाकून भाजपची अडचण केली आहे. याबाबत बोलताना गृहमंत्री दिलीप वळसे पाटील म्हणाले की, कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी लाऊडस्पीकरबाबत एकमत झाले आहे. हा निर्णय सर्वोच्च न्यायालयानं दिला असल्यामुळे तो संपूर्ण देशाला लागू आहे. त्यामुळे याबाबत केंद्र सरकारने राष्ट्रीय पातळीवर निर्णय घेऊन तो लागू करावा. यामुळे प्रत्येक राज्यांत वेगवेगळी परिस्थिती राहणार नाही. यासाठी आवश्यकता भासल्यास सर्वपक्षीय शिष्टमंडळ केंद्र सरकारची भेट घेईल. केंद्राच्या पर्यावरण विभागाने घेतलेल्या निर्णयांची केवळ गृह खाते अंमलबजावणी करीत आहे.

बैठकीत अतिशय साधक बाधक चर्चा झाली. राज्य सरकारने कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी सर्व प्रयत्न करावेत आणि त्यानुसार कारवाई करावी, असं मत व्यक्त करण्यात आलं आहे. भाजपचे प्रतिनिधी कुणी हजर राहू शकले नाहीत. लाऊडस्पिकरबाबत सर्वोच्च न्यायालयाने 2005 मध्ये निर्णय दिला होता. त्यानंतर अन्य काही न्यायलयांनी निर्णय दिले आहेत. त्याआधारे महाराष्ट्र सरकारने 2015 आणि 2017 मध्ये अध्यादेश काढले. त्यानुसार लाऊडस्पिकरचा वापर अटी, शर्ती, वेळ आणि आवाज मर्यादा स्पष्ट केल्या आहेत. त्या आधारे आजपर्यंत राज्यात लाऊडस्पिकरचा वापर होत आहे, असेही वळसे पाटलांनी सांगितले.

गेल्या काही दिवसांत अमुक तारखेला लाऊडस्पिकर उतरवले नाही तर आम्ही लावू, अशी भूमिका काहींनी घेतली आहे. लाऊडस्पिकर लावणे आणि उतरवणे हे सरकार करू शकत नाही. लाऊडस्पिकर लावणाऱ्यांनी काळजी घेणे महत्वाचे आहे. एखाद्या समजाबाबत भूमिका घेतली तर त्याचे परिणाम इतर समाजांवरही होतात. खेडेगावात रोज भजन आणि कीर्तन होत असतात. कायदा भंग झाला तर सगळीकडेच पोलिसांनी कारवाई करणे अपेक्षित आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

मशिदीवरील भोंग्यांवरुन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्य सरकारला ३ मे पर्यंतचा अल्टिमेटम दिला आहे. मशिदीवरील भोंगे उतरले नाहीत तर मशिदींसमोर लाऊडस्पीकरवर हनुमान चालिसा वाजवू, असा इशाराच राज ठाकरे यांनी दिला होता. त्यानंतर या पार्श्वभूमीवर गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी यांनी राज्याचे पोलीस महासंचालक आणि मुंबईच्या पोलीस आयुक्तांना प्रार्थनास्थळांवरील भोंग्याबाबत एकत्रित धोरण तयार करण्याची सूचना केली होती.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT