Disley Guruji, Eknath Shinde, Devendra Fadnavis Sarkarnama
मुंबई

कारवाईचा बडगा उगारलेले 'डिसले गुरुजी' मुख्यमंत्री अन् उपमुख्यमंत्र्यांसमोर भावूक

डिसले गुरूजींना राजीनामाही दिला मात्र त्यांच्यावरील कारवाई सुरू राहणार आहे.

सरकारनामा ब्युरो

मुंबई - सोलापूर जिल्ह्यातील परितेवाडी ( ता. माढा ) येथील जिल्हा परिषद शिक्षक रणजितसिंह डिसले गुरूजी यांना ग्लोबल टीचर पुरस्कार मिळाला होता. मात्र ते ३४ महिने कामावर गैरहजर राहूनही पगार घेत असल्याचे कारण देत सोलापूरचे शिक्षणाधिकारी ( प्राथमिक ) किरण लोहार यांनी त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारला आहे. त्यामुळे डिसले यांना राजीनामाही दिला. मात्र त्यांच्यावरील कारवाई सुरू राहणार असल्याने अखेर त्यांनी तेथे आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन या प्रकरणात न्याय देण्याची विनंती केली. (Action against Disley Guruji News Update)

यावेळी डिसले यांनी भावुक होऊन अधिकाऱ्यांच्या विशेषत: प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांच्या त्रासाबद्दल भाष्य केल्याचे बोलले जात आहे. त्यानंतर ‘तुम्ही निश्चिंत राहा, काही कारवाई होणार नाही, राजीनामा मागे घ्या,’ असे सांगून तुमच्यावर अन्याय होऊ देणार नाही असे आश्वासन आज मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी दिले. पण, सोलापूर जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाने केलेल्या चौकशी समित्यांचा अहवाल मागवून घेतला जाणार आहे. त्यामुळे तूर्तास त्यांच्यावरील कारवाईला ब्रेक लागला आहे.

सह्याद्री अतिथीगृहावर डिसले यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्यावेळी त्यांच्यासमवेत भाजप शिक्षक आघाडीचे प्रदेश सहसंयोजक अनिल बोरनारे, आमदार गिरीश महाजन, सुभाष देशमुख, प्रविण दरेकर आदी उपस्थित होते

डिसले यांनी जिल्हा परिषद शाळेच्या माध्यमातून आगळावेगळा शिक्षणात प्रयोग करत जगात महाराष्ट्राचे नाव मोठे केले आहे. त्यामुळे त्यांच्या शिक्षण क्षेत्रातील योगदान मोठे आहे असं असतांना देखील अधिकाऱ्यांकडून नाहक त्रास दिला जात असून त्यामुळे शिक्षणक्षेत्राची मोठी बदनामी होत असल्याचे अनिल बोरनारे यांनी सांगितले.

का होत आहे कारवाई

डिसले गुरुजी यांना पीएच.डी. करण्यासाठी अमेरिकेतील फुल ब्राईट संस्थेने शिष्यवृत्ती मंजूर केली होती. त्यामुळे त्यांना अभ्यासासाठी अमेरिकेत जायचे होते. त्यासाठी रजा मिळावी म्हणून त्यांनी सोलापूर जिल्हा परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांची भेट घेतली. मात्र त्यांनी रजे संदर्भात शिक्षणाधिकारी लोहार यांची भेट घेण्यास सांगितले. त्यानुसार त्यांनी लोहार यांची भेट घेतली. यात त्यांनी पीएच.डी. संदर्भातील रजा मिळविण्यासाठी मोठी नियमावलीच सादर केली. तसेच रजा मिळविण्यासाठी शिष्यवृत्ती संदर्भातील माहिती सादर करायला लावली होती.

डिसले हे 34 महिने कामावर हजर नव्हते. त्यामुळे त्यांची चौकशी होऊन त्याचा अहवाल लोहार यांनी तयार करून डिसले गुरूजींवर कारवाई करण्याचे निश्चित केले. डिसले गुरूजींनी 7 जुलैला राजीनामा नोटीस दिली आहे. 8 ऑगस्टला त्यांचा राजीनामा मंजूर होणार आहे. असे असतानाही त्यांच्यावर कारवाई होणारच असे लोहार यांनी स्पष्ट केले असल्याने ही कारवाई टळावी म्हणून डिसले गुरूजींनी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांची आज भेट घेतली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT