पुणे : राज्यात शिंदे फडणवीस सरकार स्थापन होऊन आज १६ दिवस झाले. पण अद्याप नव्या सरकारने मंत्रिमंडळ विस्तार केलेला नाही. मंत्रिमंडळ विस्तारावरुन शिंदे-फडणवीस गटात मलाईदार खात्यांसाठी चढाओढ सुरु असल्याच्या चर्चाही राजकीय वर्तुळात सुरु आहेत. अशात विरोधकांकडूनही मंत्रिमंडळ विस्तारावरुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्यावर टिकेचे बाण सोडले जात आहेत.
राज्यातील नव्या सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराबाबत ज्येष्ठ विचारवंत प्रा. हरी नरके (Hari Narke) यांनी आपले मत व्यक्त केले आहे. राज्याच्या मंत्रिमंडळात किमान 12 मंत्र्यांचे असणे बंधनकारक आहे. त्यापेक्षा कमी संख्येचा मंत्रिमंडळाला संविधानाची मान्यता नसते, असे सांगत राज्यातील दोन नेत्यांच्या सरकारवर निशाणा साधला आहे.
प्रा. हरी नरके म्हणतात की, ''भारतीय राज्यघटनेच्या कलम 164 (1A) नुसार राज्याचे मंत्रीमंडळ किमान 12 मंत्र्यांचे असणे बंधनकारक आहे. त्यापेक्षा कमी संख्येचा मंत्रिमंडळाला संविधानाची मान्यता नाही. त्यामुळे गेले 2 आठवडे महाराष्ट्रात 2 मंत्र्यांचे मंत्रीमंडळ जे निर्णय घेतेय त्याला घटनात्मक वैधता आहे का? घटनातज्ज्ञांनी यावर प्रकाश टाकावा. (देवेंद्र फडणवीस यांच्या काळात महाधिवक्ता हे लाभाचे पद भूषवलेले किंवा मनाचे श्लोक सांगणारे उदयोन्मुख भावी महाधिवक्ता यांनी सरकारची तळी उचलून धरणे अगदीच स्वाभाविक आहे. तटस्थ घटनातज्ञ काय म्हणतात ते महत्वाचे.)
राज्यातील रखडलेला मंत्रिमंडळ विस्तार येत्या १९ जुलै रोजी होणार असल्याची माहिती भाजपच्या गोटातून समोर आली आहे. पहिल्या टप्प्यात कॅबिनेट मंत्री म्हणून आठ ते दहा जणांचा समावेश होणार असल्याचे सांगण्यात येत असून यात मुख्यमंत्री शिंदे गटाचे चार ते पाच व तितकेच भाजपाचे मंत्री शपथ घेतील, असेही सांगण्यात आले आहे.
शिंदे गटात सात माजी मंत्री आहेत. त्यांची वर्णी मंत्रीमंडळात लागेल, अशी चर्चा सुरु आहे. शिंदे गटाकडून (Eknath Shinde) अधिकच्या मंत्रीपदाची मागणी, बंडखोर आमदारांच्या नाराजीची शक्यता असल्याने मंत्रीमंडळ विस्तार लांबणीवर पडला आहे. राष्ट्रपती निवडणुकीपूर्वी मंत्रिमंडळ विस्तार केल्यास मंत्रिपद न मिळालेल्यांच्या नाराजीचा फटका भाजप उमेदवाराला बसण्याची भीती आहे.
"राष्ट्रपती पदाचे मतदान पार पडू द्या. आमदार मुंबईत असतील तेव्हा विस्तार करा.पहिल्या टप्प्यात दोन्ही गटांचे प्रत्येकी ५ मंत्री शपथ घेतील’, असे केद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे आदेश असल्याचे समजते. त्यामुळे १९ जुलैला मंत्रिमंडळ विस्तार होणार का हे पाहणे म्हत्त्वाचे ठरणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.