Rohit Pawar-Sharad Pawar sarkarnama
मुंबई

Rohit Pawar News : शरद पवारांना डिवचल्यावर काय होतं हे त्यांना समजेल; रोहित पवारांनी भाजपला सुनावले खडेबोल

शर्मिला वाळुंज

Dombivali : "राष्ट्रवादीमध्ये हात घालून त्यांनी शरद पवारांना डिवचले असून, पवारांना डिवचल्यावर काय होतं, हे आता त्यांना समजेल," असा इशारा राष्ट्रवादीचे नेते, आमदार रोहित पवारांनी भाजपला लगावला.

ठाणे जिल्ह्यातील विकासकामांवरून येथील जनता नाराज आहे, असे सांगत अप्रत्यक्षरित्या त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार डॉ. श्रीकांत शिंदेंनादेखील लक्ष केले. ते कल्याण येथे बोलत होते. उल्हासनगर येथील पप्पू कलानी यांची रोहित यांनी भेट घेतल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे.

महाविकास आघाडीच्या वतीने कल्याणमधील स्प्रिंग टाईम सभागृहात आमदार रोहित पवारांच्या जाहीर सभेचे आयोजन शुक्रवारी केले होते. राष्ट्रवादी प्रवक्ते महेश तपासे, जिल्हा अधीक्षक सचिन पोटे, विकास लवांडे, वंडार पाटील, सचिन बासरे, रवी कपोते, अंकुश जोगदंड उपस्थित होते.

रोहित पवार कल्याणमध्ये लोकलचा प्रवास करून आले. आपल्या भाषणाची सुरुवातच त्यांनी ठाणे जिल्ह्यातील रस्त्यांचा प्रश्न आणि वाहतूक कोंडी यावर टीका करीत केली. बांद्रावरून निघालो तेव्हा फार जोशमध्ये होतो. गुगलमध्ये पाहिलं किती वेळ लागेल, तेव्हा समजलं साडेतीन तास लागतील. म्हणून मी लोकलचा पर्याय निवडला. एकीकडे एसी गाडी होती निवांत बसून येता आले असते, ज्याप्रमाणे आताचे सरकार आहे, तर दुसरीकडे प्रवासात संघर्ष होता. तो संघर्ष मी निवडला,"

"लोकांच्या हितासाठी लढायचं अशी ही लोकल आम्ही निवडली. लोकलने येत असताना ठाणे, कल्याण येथील नागरिक भेटले. त्यांनी आमच्याशी संवाद साधताना सांगितले, आमच्या भागात मुख्यमंत्री आहेत, केंद्रीय मंत्री आहेत, मुख्यमंत्री यांचे सुपुत्र येथील खासदार आहेत. पण विकासाच्या बाबतीत पाहिले तर त्या लेव्हलचा विकास कुठेही होताना दिसत नाही, असं लोक बोलतात. आरोग्य, महिलांवर होणारे हल्ले, वाहतूक कोंडीविषयी लोकांनी सांगितले," असे रोहित पवारांनी सांगितले.

"येथे फक्त भिंती रंगवल्या जातात हेसुद्धा त्यांनी सांगितले. रस्ते दुरुस्त करण्याच्या नावाखाली चांगले रस्ते उखडले जातात. अशा सगळ्या गोष्टी लोकांकडून आम्हाला समजल्या आहेत आणि या सगळ्या गोष्टीत एवढेच सांगतो की, येथील जनता नाराज आहे," असे म्हणत रोहित यांनी मुख्यमंत्री शिंदे आणि खासदार शिंदे यांच्यावर टीका केली.

ही लढाई अस्मितेची

"सध्या काही सर्व्हेदेखील येत आहेत, या सर्व्हेमध्ये त्यांचा आकडा 40 च्यावर जात नसल्याने त्यांनी राष्ट्रवादी फोडली. लोकसभेत सत्तेला भाजप व शिंदे गट मिळून 40 च्या पुढे त्यांचा आकडा जात नव्हता म्हणून त्यांनी राष्ट्रवादीमध्ये हात घातला. मराठी माणसे स्वाभिमानासाठी कधीही दिल्ली पुढे झुकत नाही. ही लढाई अस्मितेची आहे. सत्तेत आम्ही जाऊ शकलो असतो, संधी होती. उद्धव ठाकरे यांच्याकडे संधी होती भाजपसोबत जाण्याची, शरद पवार यांच्याकडे संधी होती रिटायर्ड व्हायची, पण ते झाले नाहीत. ते स्वतःचा नाही तर भावी पिढीचा विचार करतात," असे रोहित पवारांनी सांगितले.

पप्पू कलानी कोणत्या गटात?

रोहित पवारांनी कलानी यांची भेट घेतली. त्यामुळे आतापर्यंत पप्पू कलानी हे कोणत्या गटात हे चित्र स्पष्ट होत नव्हते, या भेटीमुळे शरद पवार यांच्यासोबत कलानी असल्याची एक चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. आगरी कोळी बांधवांनी दिलेली टोपी परिधान करून रोहित पवार यांनी भाषण केले.

Edited By : Mangesh Mahale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT