Mahavitaran Sarkarnama
मुंबई

विजेचं अभूतपूर्व संकट; महावितरण उचलणार मोठं पाऊल

महाराष्ट्रासह गुजरात, आंध्र प्रदेश व अन्य काही राज्यांमध्ये विजेच्या तात्पुरत्या भारनियमनाला सामोरे जावे लागत आहे.

सरकारनामा ब्युरो

मुंबई : विजेची मागणी प्रचंड वाढल्याने देशभरात सध्या अभूतपूर्व संकटाची स्थिती निर्माण झाली आहे. महाराष्ट्रासह (Maharashtra) गुजरात, आंध्र प्रदेश व अन्य काही राज्यांमध्ये विजेच्या तात्पुरत्या भारनियमनाला सामोरे जावे लागत आहे. महाराष्ट्रात विजेची वाढती मागणी व कोळशाअभावी अपुऱ्या वीज निर्मितीमुळे सुमारे अडीच ते तीन हजार मेगावॅट विजेची तूट जाणवत आहे. ही तुट भरून काढण्यासाठी महावितरण (Mahavitaran) मोठं पाऊल उचलणार आहे.

महावितरणकडून राज्यात अनेक भागांत भारनियम केले जाणार आहे. ग्रामीण भागासह शहरी भागालाही त्याचा फटका बसणार आहे. तुट भरून काढण्यासाठी गरजेनुसार शहरी व ग्रामीण भागातील वीजवाहिन्यांवर आयोगाच्या मार्गदर्शक तत्वानुसार विजेचे तात्पुरते भारनियमन करावे लागणार असल्याचे महावितरणकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. ही तूट भरून काढण्यासाठी महावितरणकडून अतिरिक्त वीज मिळविण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरु आहेत, असंही महावितरणचा दावा आहे.

फेब्रुवारीपासून उष्णतेच्या लाटेमध्ये सातत्याने वाढ होत आहे. औद्योगिक उत्पादनासोबतच कृषिपंपाचा वीजवापर देखील वाढला आहे. त्यामुळे राज्यात २८ हजार मेगावॅटपेक्षा अधिक विजेची विक्रमी मागणी सध्या कायम आहे. मुंबई वगळता महावितरणच्या कार्यक्षेत्रात सद्यस्थितीत मागील वर्षाच्या पूर्वीच्या तुलनेत तब्बल चार हजार मेगावॅटने वाढ झालेली आहे. गेल्या पंधरवड्यापासून महावितरणची विजेची मागणी तब्बल २४ हजार ५०० ते २४ हजार ८०० मेगावॅटवर पोहोचली आहे. विजेच्या मागणीचा चढता आलेख लक्षात घेता ही मागणी २५ हजार ५०० मेगावॅटवर लवकरच जाईल, अशी स्थिती आहे. विशेष म्हणजे रात्रीच्या कालावधीत देखील २२ हजार ५०० ते २३ हजार ००० मेगावॅट विजेची मागणी आहे, अशी माहिती महावितरणकडून देण्यात आली.

गुजरातकडून विजेची खरेदी

नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशनकडून गेल्या २८ मार्चपासून १५ जूनपर्यंत दररोज ६७३ मेगावॅट विजेचा पुरवठा सुरु झाला आहे. सोबतच शासनाने कोस्टल गुजरात (Gujarat) पॉवर लिमिटेडकडून (सीजीपीएल) ७६० मेगावॅट वीज खरेदी करण्यास मंजुरी दिली आहे. त्यापैकी ४१५ मेगावॅट वीज आजच्या मध्यरात्रीपासून उपलब्ध झालेली आहे. खुल्या बाजारात (पॉवर एक्सचेंज) विजेच्या खरेदीसाठी देशभरातून मागणी वाढल्याने प्रतियुनिट वीज खरेदीचे दर महागले आहेत. परंतु जादा दर देण्याची तयारी असून सुद्धा खुल्या बाजारामध्ये खरेदीसाठी अपेक्षित प्रमाणात वीज उपलब्ध होत नसल्याची स्थिती आहे. वीजटंचाईमुळे शेजारच्या आंध्रप्रदेशमध्ये औद्योगिक ग्राहकांना ५० टक्के वीजकपात सुरु करण्यात आली आहे तर गुजरातमध्येही औद्योगिक ग्राहकांचा वीजपुरवठा आठवड्यातून एक दिवस बंद ठेवण्यात येत आहे. तसेच इतर राज्यांमध्ये देखील शेतकऱ्यांसह अन्य ग्राहकांच्या वीजपुरवठ्यामध्ये कपात करण्यात येत आहे.

कोयना जलविद्युत प्रकल्पातून सध्या १८०० मेगावॅट विजेची निर्मिती सुरु आहे. येत्या ३१ मे पर्यंत जलविद्युत प्रकल्पांसाठी एकूण निर्धारितपैकी आता १७.६० टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे. एरवी वीज निर्मितीसाठी दररोज ०.३० टीएमसी पाणीवापर होत असताना विजेची वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी सध्या तब्बल ०.७० टीएमसी पाणीवापर सुरु आहे. पाणी वापरावर मर्यादा असल्याने व सध्याची प्रतिकूल परिस्थिती पाहता वीज निर्मितीसाठी आणखी १० टीएमसी पाणीसाठा वापरण्यास जलसंपदा विभागाने विशेष मंजुरी दिली आहे. कोयना जलविद्युत प्रकल्पाकडून वीजनिर्मितीमधील पाणी वापराची मर्यादा वाढल्याने वीज टंचाईपासून काहीसा दिलासा मिळणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT