मुंबई : शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांचे निकटवर्तीय प्रवीण राऊत (Pravin Raut) यांना सक्त वसुली संचालनालयाने (ED) बुधवारी अटक केली. पत्राचाळ जमीन घोटाळ्याप्रकरणी ईडीकडून ही कारवाई करण्यात आली आहे. तब्बल 1 हजार 34 कोटी रुपयांचा हा घोटाळा असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे संजय राऊतांनाही मोठा धक्का बसला आहे.
प्रवीण राऊत हे एचडीआयएलची सहाय्यक कंपनी असलेल्या गुरूआशिष कन्स्ट्रक्शन कंपनीचे संचालक आहेत. गोरेगाव येथील जमीन विक्रीत एफएसआयमध्ये गैरव्यवहार केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. या आरोपाखाली राऊत यांच्यावर ईडीकडून मनी लाँर्डिंगचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याच प्रकरणात त्यांची ईडीकडून चौकशी सुरू होती. पण त्यांच्याकडून चौकशीला सहकार्य केले जात नसल्याचे कारण देत ईडीने बुधवारी सकाळी त्यांनी अटक केली. आज त्यांना न्यायालयात आणण्यात येणार आहे.
ईडीच्या अधिकाऱ्यांनी मंगळवारी प्रवीण राऊत यांच्याशी संबंधित काही ठिकाणी छापेमारी केल्याचेही समजते. त्यानंतर त्यांना दक्षिण मुंबईतील इडीच्या कार्यालयात चौकशीसाठी बोलावण्यात आलं होते. प्रवीण राऊत याआधीही चर्चेत आले होते. त्यांचं नाव पीएमसी बँक गैरव्यवहार प्रकरणात आलं होतं. त्यावेळी ईडीने त्यांच्याशी संबंधित 72 कोटींची मालमत्ता जप्त केली होती. याच संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना ईडीने समन्स बजावले होते.
पीएमसी बॅंकेतील (PMC Bank) 4 हजार ३५५ कोटी रुपयांच्या गैरव्यवहारप्रकरणी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने ‘एचडीआयएल’चे प्रवर्तक राकेश वाधवा, सारंग वाधवा, वारियम सिंग, जॉय थॉमस व इतर आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला होता. या गैरव्यवहारातील ९५ कोटी एचडीआयएलमार्फत प्रवीण राऊत यांनी इतर ठिकाणी वळविल्याचे ईडीच्या तपासात समोर आले आहे. या व्यवहाराची कोणतीही कागदपत्रे सादर केलेली नाहीत. या पैशातून पालघर येथे जमीन घेण्यात आली होती.
याशिवाय गैरव्यवहारानंतर एक कोटी ६० लाख प्रवीण राऊत यांनी त्यांची पत्नी माधुरी राऊत यांना दिले होते. त्यातील ५५ लाख रुपये बिनव्याजी कर्ज म्हणून शिवसेनेचे नेते संजय राऊत यांची पत्नी वर्षा राऊत (Varsha Raut) यांना देण्यात आले होते. त्या रकमेतून दादर पूर्व येथे घर खरेदी करण्यात आले होते. याशिवाय माधुरी राऊत व वर्षा राऊत या मे. अवनी कन्स्ट्रक्शन कंपनीत भागीदार असल्याचे ईडीने सांगितले होते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.