Nawab Malik| मुंबई : सक्तवसुली संचलनालयाने राष्ट्रवादीचे (ncp) नेते आणि माजी मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांना मोठा दणका दिला आहे. मलिक यांची संपत्ती जप्त करण्याची परवानही ईडीला मिळाली आहे. त्यानुसार नवाब मलिक आणि त्यांच्या नातेवाईकांच्या संपत्ती जप्त करण्यात येणार आहे. मलिक यांच्या मुंबईतल्या गोवावाला कंपाऊंडमधील जमीन, कुर्ला पश्चिम या ठिकाणी असलेले तीन फ्लॅट, वांद्रे पश्चिम या मधील दोन फ्लॅट आणि उस्मानाबाद जिल्ह्यातील १४७ एकर शेत जमीन जप्त करण्यात येणार आहे.
अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याची दिवंगत बहीण हसीना पारकरशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणी ईडीने फेब्रुवारी महिन्यात नवाब मिलक यांना अटक केली होती. तेव्हापासून ते तुरुंगात न्यायालयीन कोठडीत आहेत. एप्रिल महिन्यात अधिनिर्णय प्राधिकरणाने परवानगी दिल्यानंतर ईडीने तात्पुरत्या स्वरूपात मलिक कुटुंबाची संपत्ती जप्त केली होती. तर आता जप्त करण्यात येणारी मालमत्ता ही नवाब मलिक आमि त्यांचे कुटुंबीय, सॉलिडस इन्व्हेस्टमेंट्स प्रायव्हेट लिमिटेड आणि मलिक इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीशी संबंधित आहेत.
कुर्ल्यातील गोवावाला कंपाऊंडमध्ये तीन एकरची जागा मुनिरा प्लंबर यांची होती. पण मुनिरा यांनी नवाब मलिक यांनी दाऊदची बहीण हसीना पारकरसोबत आपली जागा हडपल्याची तक्रार मलिक यांच्या विरोधात केली आहे. याच प्रकरणात त्यांनी आर्थिक गैरव्यवहार केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. यासोबतच यातूनच त्यांनी टेरर फंडिंगही केल्याचा आरोपही त्यांच्यावर आरोप करण्यात आले आहेत. तेव्हापासू नवाब मलिक न्यायालयीन कोठडीतच आहेत.
नवाब मलिकांवरील आरोप
ईडीने PMLA कोर्टात दाखल केलेल्या चार्जशीटमध्ये मनी लाँड्रींगच्या प्रकरणाचा उल्लेख करण्यात आला आहे. नवाब मलिक यांनी हसीना पारकर, सलीम फ्रूट आणि सरदार शहावली खान यांना कॅश आणि चेकच्या स्वरूपात पैसे दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच, बनावट कागदपत्रांच्या आधारे त्यांनी गोवावाला कंपाऊंडमधील जागेचा ताबा मिळवला. गेल्या काही वर्षांमध्ये जागेची मालकी नवाब मलिक यांच्याकडे आहे. या जागेवरीस दुकाने, गाळे यांच्या भाडे रक्कमेतून नवाब मलिक यांना साडेअकरा कोटी रूपये मिळाल्याचंही चार्जशीटमध्ये नमूद करण्यात आले आहे.
नवाब मलिक यांना जे पैसे मिळाले, ते पैसे हसीन पारकर, सलीम पटेल आणि शाहवली खान या तिघांना दिल्याचा उल्लेख या चार्जशीटमध्ये करण्यात आला आहे. शाहवली खानला बॉम्बस्फोटात अटक करण्यात आली आहे तर हसीना पारकर ही दाऊद इब्राहिमची बहीण आहे. तर हसीना पारकरचा ड्रायव्हर सलीम पटेल याच्यामार्फत हे पैसे दाऊदला किंवा त्याच्या गँगला फिरवण्यात आल्याचंही या चार्जशीटमध्ये नमूद केलं आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.