Eknath Shinde-Pratap Sarnaik Sarkarnama
मुंबई

Thane Politics: शिवसेनेच्या मातब्बर मंत्र्यालाच ‘काऊंटर’ करण्यासाठी नवी 'फिल्डिंग'? एकनाथ शिंदेंच्या 'आशीर्वादा'नं ठाण्यात नवी राजकीय समीकरणं?

Shivsena News: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पाठबळाशिवाय व्यासपीठावर शक्तिप्रदर्शन शक्य नाही, अशी चर्चा आहे. लोकमान्यनगरच्या क्लस्टरला त्यांनीच सहमती दिली होती. तसेच रिंग मेट्रोचा मार्गही बदलणे शक्य नाही, असे असतानाही मंत्री प्रताप सरनाईक यांनी विरोधी भूमिका घेतल्याने नाराजी असल्याचे समजते.

सरकारनामा ब्यूरो

Thane News : शास्त्रीनगरच्या पुनर्विकासाच्या प्रश्नावरून ठाण्यातील सत्ताधारी शिवसेना शिंदे गटातील परिवहनमंत्री प्रताप सरनाईक विरुद्ध महापालिका सभागृह नेते हणमंत जगदाळे यांच्यातील अंतर्गत संघर्ष आता उघडपणे समोर येऊ लागला आहे. क्लस्टरच्या निमित्ताने जगदाळे यांनी रविवारी (ता. २७) घेतलेल्या निर्धार मेळाव्यात हजारो नागरिकांची उपस्थिती दाखवत शक्तिप्रदर्शन केले. विशेष म्हणजे शिवसेनेतील ज्येष्ठ नगरसेवकांसह भाजप आणि मनसेच्या नेत्यांचीही एकाच व्यासपीठावर उपस्थिती दिसून आल्याने या मेळाव्याला केवळ पुनर्विकासाचा नव्हे, तर राजकीय शक्तिप्रदर्शनाचा रंग आला.

लोकमान्यनगरातील लक्ष्मी पार्क रोड येथे झालेल्या या मेळाव्यासाठी दुपारपासूनच रहिवाशांचे जत्थेच्या जत्थे हातात बॅनर घेऊन दाखल होत होते. परिसरातील मोठ्या गर्दीमुळे शिवसेनेच्या हणमंत जगदाळेंनी आपली स्थानिक संघटनात्मक ताकद दाखवून दिली. या मेळाव्यात जगदाळे यांनी नागरिकांना हक्काची अधिकृत घरे मिळवून देण्याचा निर्धार व्यक्त करताना क्लस्टर पुनर्विकास, डीपी रस्ते आणि रिंग मेट्रो प्रकल्पाला गती देण्याची भूमिका मांडली. या मेळाव्यात भाजप आणि मनसेतील राजकीय नेत्यांच्या उपस्थितीने लक्ष वेधून घेतले.

शिवसेनेचे नगरसेवक दिलीप बारटक्के, कांचन चिंदरकर, सिद्धार्थ ओवळेकर आणि योगेश जानकर, मनोज शिंदे यांच्यासह भाजप नगरसेवक अमित सरय्या आणि मनसेचे अविनाश जाधव, रवि मोरे तसेच ठाकरे गटाचे स्थानिक पदाधिकारीही व्यासपीठावर उपस्थित होते. त्यामुळे जगदाळे यांच्या नेतृत्वाखालील या मेळाव्याला पक्षीय चौकटीपलीकडचे समर्थन मिळाल्याचे चित्र निर्माण झाले.

लोकमान्यनगरातील रिंग मेट्रोच्या मार्गावरून यापूर्वीच हणमंत जगदाळे आणि परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांच्या भूमिका वेगळ्या असल्याचे समोर आले आहे. जगदाळे हे रिंग मेट्रोच्या अंमलबजावणी भूमिकेवर ठाम असताना प्रताप सरनाईक यांच्या नेतृत्वाखाली या भागात रिंग मेट्रो आणि डीपी रस्त्याच्या प्रस्तावाला विरोध करणारी सर्वपक्षीय सभा झाली होती. त्यामुळे रविवारी झालेला निर्धार मेळावा हा त्या सभेला राजकीय प्रत्युत्तर म्हणूनही पाहिला जात आहे.

विशेष म्हणजे जगदाळे यांनी आपल्या भाषणात उपमुख्यमंत्री आणि शिवसेना मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त केला. मात्र त्याचवेळी सरनाईकांच्या भूमिकेला छेद देणारी भूमिका लोकमान्यनगरातून आक्रमकपणे मांडण्यात आली. त्यामुळे ठाण्यातील शिंदेंच्या शिवसेनेत औपचारिक फूट नसली तरी स्थानिक पातळीवर नेतृत्व आणि विकासाच्या मुद्द्यांवरून दोन स्वतंत्र राजकीय भूमिका आकार घेत असल्याचे मेळाव्यातून दिसून आले.

दरम्यान, मेळाव्यात जगदाळे यांनी पुनर्विकासाच्या प्रक्रियेत नागरिकांना विश्वासात घेण्याची भूमिका मांडली. सर्वेक्षण म्हणजे विस्थापन नाही आणि मोजणी म्हणजे तोडकाम नाही, असे सांगत बाधित कुटुंबांची निश्चिती आणि पुनर्वसनाचे नियोजन झाल्याशिवाय पुढील प्रक्रिया करण्याचा प्रश्न उपस्थित केला. मात्र, या भूमिकेपेक्षा मेळाव्याला लाभलेली नागरिकांची मोठी उपस्थिती आणि विविध पक्षांच्या स्थानिक नेत्यांची हजेरीमुळे ठाण्यातील आगामी राजकारणाच्या दृष्टीने या मेळाव्याची चर्चा अधिक रंगली आहे.

समाजमाध्यमांतून तीर

या निर्धार मेळाव्यामुळे सरनाईक समर्थकांनी समाजमाध्यमांतून बोचरे तीर मारण्यास सुरुवात केली आहे. निर्धार मेळावा की, परिसरातील नगरसेवकाच्या विकासाची धडपड, असे प्रश्न विचारण्यात आले आहेत. क्लस्टरच्या माध्यमातून खरा विकास येथील रहिवाशांचा नव्हे, तर स्थनिक लोकप्रतिनिधींचा होणार असल्याचा दावाही यात करण्यात आला आहे. त्यामुळे हा वाद आणखी पेटणार असल्याचे दिसते.

सरनाईक एकाकी

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पाठबळाशिवाय व्यासपीठावर शक्तिप्रदर्शन शक्य नाही, अशी चर्चा आहे. लोकमान्यनगरच्या क्लस्टरला त्यांनीच सहमती दिली होती. तसेच रिंग मेट्रोचा मार्गही बदलणे शक्य नाही, असे असतानाही मंत्री प्रताप सरनाईक यांनी विरोधी भूमिका घेतल्याने नाराजी असल्याचे समजते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT