मुंबई : पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात वनमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागलेले संजय राठोड (Sanjay Rathod) आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या भेटीसाठी वर्षा या शासकीय निवास स्थानी दाखल झाले आहेत. या भेटीत राठोड यांना पुन्हा मंत्रीपद मिळण्याबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे राठोड हे पुन्हा मंत्रिमंडळात दिसतील, अशी शक्यता राजकीय जाणकरांकडून व्यक्त केली जात आहे. (Eknath Shinde and Sanjay Rathod meet Chief Minister Uddhav Thackeray)
पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात संजय राठाडे यांना मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. विरोधी पक्ष भारतीय जनता पक्षाने त्यांच्याविरोधात जोरदार मोहीम उघडली होती. मात्र, पूजा चव्हाण हिच्या कुटुंबीयांनी त्यांची तक्रार मागे घेतल्यामुळे संजय राठोड यांचा पुन्हा मंत्रीपदी येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून राठोड यांना मंत्रिमंडळात पुन्हा स्थान द्यावे, अशी मागणी बंजारा समाजाकडून केली जात होती.
त्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत संजय राठोड यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भेटीला जाणे हे महत्वाचे मानले जात आहे. सध्या त्यांची वर्षा या शासकीय निवासस्थानी चर्चा सुरू आहे. या भेटीत संजय राठोड यांना पुन्हा मंत्रीपद मिळण्याबाबतची चर्चा होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
संजय राठोड यांना मंत्रीमंडळात घेण्यासाठी पोहरादेवी येथे बंजारा समाजाची बैठक झाली होती. त्या बैठकीत राठोड यांना पुन्हा मंत्रीपद मिळावे, यासाठी आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. ते आंदोलन मुंबईत (स्व.) बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळी २३ एप्रिल रोजी करण्याचा निर्णय पोहरादेवी येथील बैठकीत झाला होता.
भ्रष्टाचार आरोप असणाऱ्या मंत्र्याची सध्या चौकशी सुरू आहे, तरीही ते मंत्रिमंडळात आहेत. राठाडे यांच्यावरील कोणताही आरोप अद्याप सिद्ध झालेला नाही, तरीही त्यांना मंत्रिमंडळात का घेतलं जात नाही, असा सवाल महंतांनी उपस्थित केला होता. हा बंजारा समाजावर अन्याय आहे. राठोड यांना पुन्हा मंत्री केलं नाही तर येत्या निवडणुकीत सर्वच राजकीय पक्षांना समाजाची ताकद दाखवून देऊ, असा इशाराही देण्यात आला होता, त्यामुळेच संजय राठोड यांच्या मंत्रीपदाच्या आशा पुन्हा पल्लवित झाल्या आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.