Eknath Shinde, Manoj Jarange Patil Sarkarnama
मुंबई

Eknath Shinde News: जरांगेंनी उपोषण सोडताच एकनाथ शिंदेंचं मोठं विधान; म्हणाले,'मी शिवरायांची शपथ घेऊन...'

Manoj Jarange Patil Maratha Protest : विरोधी पक्ष नेहमी विरोध करत असतो. सरकार अडचणीत येते का बघत असतो. पण त्यांना काही जमले नाही, आमचे सरकार यावर ठाम होते. मनोज जरांगे गेल्या दोन वर्षांपासून लढत असून ते अतिशय संवेदनशील असल्याचंही शिंदे म्हणाले.

Deepak Kulkarni

Mumbai News : मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी सुरू केलेले मुंबईतील आझाद मैदानातील उपोषण सोडलं आहे.सरकारच्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांच्या नेतृत्वातील मराठा आरक्षणविषयक उपसमितीला मोठं यश मिळवत जरांगेंच्या उपोषणातून योग्य मार्ग काढल्यामुळे सरकारची मोठी डोकेदुखी कमी झाली आहे. जरांगेंनी आंदोलन मागे घेतल्यानंतर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यानंतर दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनीही यावर प्रतिक्रिया देताना मोठं विधान केलं आहे.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी मंगळवारी (ता.2) मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण मागे घेतल्यानंतर प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, मी शिवरायांची शपथ घेऊन सांगितले की, मराठा समाजाला आरक्षण देणार आणि ते दिले आणि टिकवले आहे. आता ज्या मागण्या आहेत त्या मागण्या मान्य करण्याचा निर्णय घेतला आहे. आमचे मंत्रिमंडळ आहे, त्यांनी सगळ्यांनी सकारात्मक भूमिका घेतल्याचंही शिंदे यांनी सांगितलं.

तसेच इतर कोणत्याही समाजावर अन्याय होऊ नये आणि मराठा समाजाला न्याय मिळाला पाहिजे,अशी भूमिका आमच्या सरकारची असल्याचंही एकनाथ शिंदे म्हणाले. जरांगे यांच्या आंदोलनाबाबत आम्ही सुरुवातीपासून सकारात्मक होतो. जो काही निर्णय घेऊ, तो न्यायालयात कायदा टिकला पाहिजे याबाबत आम्ही विचार केल्याचा दावाही उपमुख्यमंत्री शिंदे यांनी केला.

शिंदे म्हणाले, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली कमिटी केली होती. त्या कमिटीतीली सगळ्यांचे अभिनंदन करतो. या उपसमितीनं सर्वंकष चर्चा करुन मोठा निर्णय घेतला आहे. सातारा गॅझेट आणि हैदराबाद गॅझेटबाबत मागण्या होत्या, त्याही पूर्ण केल्याचेही शिंदे यांनी म्हटलं.

यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सातारा गॅझेटसाठी थोडा अवधी लागणार असून याबाबत मनोज जरांगेंना (Manoj Jarange Patil) सांगितल्याचंही म्हणाले. मराठवाडा म्हणजेच हैदराबाद गॅझेटबाबत तात्काळ निर्णय घेण्यात आले आहेत. याविषयी मोठ्या प्रमाणावर आणखी मागणी होती,असंही शिंदे म्हणाले.

एकनाथ शिंदे यांनी यावेळी विरोधकांवर टीका केली. ते म्हणाले, विरोधी पक्ष नेहमी विरोध करत असतो. सरकार अडचणीत येते का बघत असतो. पण त्यांना काही जमले नाही, आमचे सरकार यावर ठाम होते. मनोज जरांगे गेल्या दोन वर्षांपासून लढत असून ते अतिशय संवेदनशील असल्याचंही शिंदे म्हणाले.

याचदरम्यान, ओबीसी समाज नाराज होणार नाही, कारण त्यांचे नुकसान होणार नाही याची काळजी मुख्यमंत्री फडणवीस आणि आम्ही घेतल्याचंही शिंदे यांनी सांगितलं. तसेच मराठा आंदोलनादरम्यान ज्यांचा मृत्यू झाला, त्यांना 10 लाख आणि नोकरी देण्याबाबत मी मुख्यमंत्री असताना निर्णय घेतला होता. त्याचा अनेकांना लाभ दिला आहे असे एकनाथ शिंदे म्हणाले. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या नेतृत्वात पुढील कार्यवाही होईल असेही ते म्हणाले.

मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण सोडल्यानंतर आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोशल मीडियावर प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, मराठा समाजाच्या आरक्षणासह इतर मागण्यांबाबत महाराष्ट्र शासनानं पहिल्या दिवसापासून सकारात्मक व संवेदनशील भूमिका घेतली होती. आंदोलनकर्त्यांच्या भावनांचा सन्मान राखत आणि त्यांना न्याय मिळावा यासाठी शासनानं सतत प्रयत्न केले. त्या अनुषंगानं मंत्रिमंडळ उपसमितीच्या शिफारशींवर तातडीनं निर्णय घेऊन आज शासन निर्णय प्रसिद्ध करण्यात आल्याचंही पवारांनी म्हटलं.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मी स्वतः आम्ही तिघांनी मिळून याबाबत सविस्तर चर्चा करून योग्य निर्णय होण्यासाठी सातत्यानं प्रयत्न केले. शासनाच्या या ठोस व सकारात्मक भूमिकेला प्रतिसाद देत श्री. मनोज जरांगे पाटील यांनी आपलं आंदोलन मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्या भावना आणि मराठा समाजाच्या अपेक्षांना न्याय देण्याचा प्रयत्न शासनानं केल्याचंही अजितदादांनी सांगितलं.

समाजहिताचे प्रश्न संवाद आणि ठोस निर्णय प्रक्रियेतूनच मार्गी लावले जातील. मराठा समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक प्रगतीसाठी महाराष्ट्र शासन वचनबद्ध आहे. तसंच मराठा समाजासह संपूर्ण महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी शासन कटिबद्ध आहे. त्यासाठी आवश्यक ती सर्व पावलं उचलली जातील, असा विश्वास सरकारच्या वतीनं देत असल्याचं आश्वासनही अजित पवारांनी यावेळी मराठा समाजाला दिला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT