Manoj Jarange Vs Government Sarkarnama
मुंबई

Maratha Reservation News: मराठा आरक्षणावर शिंदे-फडणवीस-पवार खरंच गंभीर आहेत का? Video Viral; नेमकं काय घडलं...

CM Eknath Shinde News : गंभीर आणि ज्वलंत प्रश्नी तेवढे गंभीर आहेत का,अशी शंका घेणारी चर्चा सुरू झाली आहे.

उत्तम कुटे

Mumbai : मराठा आरक्षणावरून जालनाच नाही, तर राज्यभर सुरू झालेल्या तीव्र आंदोलनामुळे राज्य सरकारची कोंडी झाली आहे. त्यामुळे त्यातून सुटका करून घेण्यासाठी त्यांनी सोमवारी (ता.११) सर्व राजकीय पक्ष व मराठा संघटनांची मुंबईत बैठक घेतली. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे मीडियाला सामोरे गेले. ती सुरू होण्यापूर्वी या तिघांचा एक व्हिडिओ आता व्हायरल झाला आहे. त्यातून ते या गंभीर आणि ज्वलंत प्रश्नी तेवढे गंभीर आहेत का,अशी शंका घेणारी चर्चा सुरू झाली आहे.

मराठा आरक्षणासाठी १५ दिवसांपासून अंतरवाली सराटी (जि. जालना) येथे आमरण उपोषणाला बसलेले मनोज जरांगे पाटील यांच्याबरोबर चर्चेच्या अनेक पातळीवरील फेऱ्या करूनही त्याला यश न मिळाल्याने अखेर राज्य सरकारने ही सर्वपक्षीय बैठक घेतली. त्यानंतर त्यांनी काही महत्त्वपूर्ण घोषणा मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी मीडियासमोर केल्या.

मराठा आरक्षणासाठी थोडा वेळ लागणार असल्याने जरांगेंनी उपोषण मागे घेण्याची विनंती त्यांनी केली. आंतरवली सराटीतील गावकऱ्यांवर दाखल झालेले गुन्हे मागे घेण्यात आल्याची तसेच लाठीमार करणाऱ्या पोलिस अधिकाऱ्यांवर बदली आणि निलंबनाची कारवाई करण्यात आल्याची माहिती त्यांनी या वेळी दिली. न्यायालयात टिकणारे आरक्षण द्यायचे आहे, असे त्यांनी या वेळी सांगितले.

'हे ऐकू जातं'...

सह्याद्री या सरकारी गेस्टहाऊसवर पत्रकार परिषद होण्यापूर्वी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्यात झालेल्या संवादाचा व्हिडिओ आता व्हायरल झाला आहे. त्यातून सरकार मराठा आरक्षणावर खरंच गंभीर आहेत का, अशी शंका घेणारी चर्चा सुरू झाली आहे. मीडियाला सामोरे जाण्यापूर्वी आपण बोलून मोकळं व्हायचं फक्त आणि निघून जायचं, असे मुख्यमंत्री हे दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना सांगताना ऐकू येत आहे. त्यावर मीडियाचे बूम समोर असल्याने सजग आणि सावध असलेले फडणवीस फक्त मान डोलावतात,तर पवार हे हो आणि एस म्हणतात. त्यानंतर हे तिघेही बसतात. बसताच पवार 'हे ऐकू जातं' असं म्हणत शिंदेंना सावध करतात.

या व्हिडिओमुळे विरोधी पक्षांसह मराठा आरक्षण समर्थक यांच्या हातात आयतेच कोलीत मिळाले आहे. त्यांच्याकडून यावर तीव्र प्रतिक्रिया येण्याची शक्यता असून, मुख्यमंत्रीही आणखी अडचणीत येतील, असा अंदाज आहे.

Edited By : Mangesh Mahale

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT