Eknath Shinde News, Rajya Sabha election 2022 News updates
Eknath Shinde News, Rajya Sabha election 2022 News updates Sarkarnama
मुंबई

एकनाथ शिंदे शिवसेना आमदारांच्या बसमधून उरतले...

सरकारनामा ब्यूरो

मुंबई : राज्यसभा निवडणुकीत (Rajya Sabha election 2022) कोणताही धोका पत्करायचा नाही, असे धोरण ठेवून शिवसेना आमदारांना (Shiv sena MLAs) 'वर्षा' वरून थेट मडमधल्या 'रिट्रीट'मध्ये आज धाडण्यात आले. मतदानाच्या चार दिवस आधीच आमदारांना आजपासून बंदिस्त करण्यात येणार आहे. या साठी दोन बसमधून मंत्री, आमदार हे रिसाॅर्टकडे रवाना झाले. पण `सी लिंक` आल्यानंतर नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे बसमधून उतरले. याचा अर्थ ते रिसाॅर्टवर थांबणार नसल्याचे सांगण्यात आले. (Rajya Sabha election 2022 News updates)

भाजपचे नेते प्रवीण दरेकर यांनी आज सकाळीच माध्यमांशी बोलताना एकनाथ शिंदे नाराज असल्याचा आरोप केला होता. अर्थात दरेकर यांच्या आरोपांची सेनेने खिल्ली उडविली होती. शिंदे यांच्याकडे इतर जबाबदारी असल्याने ते आमदारांसोबत जाणार नसल्याची चर्चा आहे. सरकार स्थापनेच्या वेळी शिवसेना आणि राष्ट्रवादीच्याही आमदारांची व्यवस्था पाहण्याची जबाबदारी शिंदे यांनी घेतली होती, हे विशेष. (Eknath Shinde News)

त्याआधी शिवसेनेचे पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी प्रत्येक आमदारांशी बोलून विरोधकांना न घाबरायचे नाही, असे सांगून 'बळ' दिले. आमदारांचा हॉटेलवरील नियोजित मुक्काम हा ८ जूनपासून ठरला असतानाही दोन दिवस आधीच त्यांना आपल्या नजरेपुढे ठेवण्याचा निर्णय ठाकरे यांनी घेतला. नियोजित ट्रायडंट'मधील मुक्कामाचे ठिकाण बदलून आमदारांना रिट्रीटमध्ये हलविण्याचे वृत्त सगळ्याआधी 'सरकारनामा'ने प्रसिद्ध केले होते. त्यावर शिक्कामोर्तब झाले. दोन बसमधून या आमदारांना पाठविण्यात आले.

राज्यसभा निवडणुकीत सहा जागांसाठी सात उमेदवार रिंगणात आल्याने शिवसेनेने सावध पावले उचलली आहेत. शिवसेनेचे आमदारांत फोडाफोडी होण्याच्या शक्यता नेत्यांनी वाटत आहे. त्यामुळे पक्षाच्या राज्यभरातील आमदारांना मुंबईत बोलावून त्यांच्यासाठी ट्रायडंट हाॅटेल बुक केले होते. परंतु, या हॉटेलमध्ये भाजप नेत्यांची घुसखोरी होण्याची भीतीने शिवसेना नेतृत्वाच्या पोटात गोळा आला आणि आपल्या आमदारांच्या मुक्कामाचे ठिकाण बदलले. `ट्रायडंट`चे बुकिंग रद्द करून मडमधील रिट्रीटमध्ये आमदारांना ठेवण्याची तयारी शिवसेनेने शनिवारी केली होती. त्यानुसार आज वर्षा बंगल्यावर या आमदारांना बोलविण्यात आले. स्वतः ठाकरे यांनी त्यांच्याशी संवाद साधला. अपक्षांपैकी केवळ आशिष जयस्वाल हेच या वेळी हजर होते. मराठवाड्यातील आमदार हे ठाकरे यांची आठ जूनची सभा पार पडल्यानंतर मुंबईत दाखल होणार आहेत.

भाजपने राज्यसभेसाठीचे आपले तीनही उमेदवार निवडून आणण्यासाठी दिल्लीतून नेत्यांची फौज मागवली आहे. भाजपच्या या तयारीला सेनेनेही तसेच उत्तर दिले आहे. इतर पक्षांचे आमदार फोडण्यापेक्षा आपले आमदार सुरक्षित ठेवणे याला आधी प्राधान्य देण्यात आले. दोन बस वर्षावर मागविण्यात आल्या. तेथूनच त्यांची रवानगी रिट्रीटमध्ये करण्यात आली. भाजपच्या वाऱ्यालाही हे आमदार येणार नाहीत, अशी चोख व्यवस्था येथे ठेवण्यात आली आहे.

शिवसेनेच्या या कृतीवर दुसरे अपक्ष आमदार रवी राणा यांनी टीका केली आहे. मुख्यमंत्री ठाकरे यांचा आपल्याच आमदारांवर विश्वास नसल्याचा दावा त्यांनी केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT