मुंबई : एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना छातीवर दगड ठेवून मुख्यमंत्रीपदी बसविल्याचे विधान भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी केल्यानंतर त्यावर सावरासावर करण्याची वेळ उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर आली. ``माध्यमांनी पाटील यांच्या विधानाचा चुकीचा अर्थ काढला. पण एकनाथ शिंदे यांना आम्ही आनंदाने मुख्यमंत्री म्हणून स्वीकारले आहे. आम्हा सर्वांचे नेते तेच आहेत. राज्याला एकच मुख्यमंत्री असणार आहे ते म्हणजे शिंदे हेच आहेत, अशा स्पष्ट शब्दांत फडणवीस यांनी आपली भूमिका मांडली.
प्रदेश भाजपच्या एक अधिवेशनाचा समारोप फडणवीस यांच्या भाषणाने झाला. त्यावर त्यांनी या सरकार स्थापनेमागच्या घटनांना उजाळा दिला. तसेच शिंदे सरकार हे निर्विवादपणे पुढील अडीच वर्षे काम करणार आहे. त्यानंतर कामाच्या जोरावर पुन्हा सत्तेत येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
फडणवीस म्हणाले की विरोधी पक्षनेता म्हणून गेले अडीच वर्षे सर्व आमदार माझ्या पाठीशी होते. हे अनाचारी महाविकास आघाडी सरकार सत्तेवरून जात नव्हते. लोकांना वाटत होते हे स्वस्थ का बसले? तरी माझ्या निर्णयावर कुणीही प्रश्न विचारला नाही. मला सेनापती केले ते सर्व माझ्यासोबत होते. पण तिकडे जे सेनापती झाले (उद्धव ठाकरे) त्यांच्या मागचे सर्व निघून गेले. माजी मंत्री अब्दुल सत्तार यांनी सरकार बदलानंतरची स्थिती योग्य शब्दांत सांगितली. पूर्वी राज्यात लेना बँक होती आता देना आहे, असे त्यांनी नव्या सरकारचे वर्णन केले.
विरोधी पक्षात असताना आपण डिटेक्टिव्ह होतो. आता सत्ता पक्षात आलो तर आपण सुपर अॅक्टिव्ह आहोत. गेल्या अडीच वर्षांचा बॅक लॉग आपल्याला दीड वर्षात पूर्ण करायचा आहे. महाविकास आघाडी सरकारने पहिल्या तीस दिवसात स्थगिती शिवाय काही केले नव्हते. पण आपण निवडून आल्यानंतर 24 दिवसांत ओबीसी आरक्षण, जलयुक्त शिवार, पेट्रोल- डिझेलचे भाव कमी केले. मेट्रो, कारशेड, औरंगाबाद, उस्मानाबाद यांच्या नामांतराचा तसेच थेट जनतेतून सरपंच आणि नगराध्यक्ष निवडण्याचा निर्णय घेतला. दोन वर्षानंतर मोकळा श्वास घेऊन गणपती उत्सव, गोविंदावर निर्बध हटवले. आता कसे वाटते मोकळे वाटते. छान छान वाटते, अशी परिस्थिती आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.