Eknath Shinde Sarkarnama
मुंबई

Eknath Shinde on MVA : '...त्यासाठीच आम्ही महाविकास आघाडीची सत्ता उलथवून टाकली' ; एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल

Kalyan West Assembly Constituency News : 'राज्यामधील महिला भगिनींकडे जो वाकड्या नजरेने बघेल त्याचे बदलापूरच्या नराधमासारखेच परिणाम होतील.' असा इशाराही मुख्यमंत्री शिंदे यांनी दिला.

शर्मिला वाळुंज

CM Shinde Rally in Kalyan West Assembly Constituency News : 'गेल्या अडीच वर्षांच्या कार्यकाळात महाराष्ट्राला अधोगतीकडे नेण्याचे काम महाविकास आघाडी सरकारने केल्याने आम्ही हे महाराष्ट्रविरोधी सरकार उलथवून टाकले.' अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे, काँग्रेस आणि महाविकास आघाडी सरकारवर हल्लाबोल केला. कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार विश्वनाथ भोईर यांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कल्याणमध्ये आले होते. येथील स्व. यशवंतराव चव्हाण क्रीडांगण येथे झालेल्या महाविजय संकल्प सभेमध्ये ते बोलत होते.

यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(Eknath Shinde) म्हणाले, 'महाविकास आघाडीच्या काळामध्ये महाराष्ट्र देशामध्ये तिसऱ्या स्थानावर फेकला गेला होता. मात्र महायुतीचे सरकार आल्यावर आम्ही अवघ्या सहा महिन्यात हा महाराष्ट्र पुन्हा एकदा उद्योग व्यवसाय, गुंतवणूक, स्टार्टअप, पायाभूत सुविधा अशा प्रमुख क्षेत्रात पहिल्या क्रमांकावर आणला. त्यासाठीच आम्ही राज्यातील महाविकास आघाडीची सत्ता उलथवून टाकल्याचे सुतोवाच मुख्यंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी केले. तर लोकसभेतील फेक नरेटीव्ह आता चालणार नाही. जे संविधान बदलाची ओरड करत होते त्या काँग्रेस पक्षानेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पराभव करत खूप त्रास दिल्याचे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.

तर आपल्याला अजिबात हलक्यात घेऊ नका, शिवसेना प्रमुखांचे विचार आणि धनुष्यबाण ज्यांनी काँग्रेसच्या(Congress) दावणीला बांधले, ते महाविकास आघाडीचे सरकार आपण उलथवून टाकले. जर का असे केले नसते तर कल्याण पश्चिमसह संपूर्ण महाराष्ट्रात विकासकामांची गंगा आज निर्माण झाली नसती. येत्या काळात कल्याण पश्चिमेतील मेट्रोचे कामही लवकर सुरू होईल. अशा शब्दांत मुख्यमंत्री शिंदे यांनी कल्याणकर नागरिकांना आश्वस्त केले.

डायलॉगच्या माध्यमातून विश्वनाथ भोईर यांचे कौतुक...

या जाहीर सभेमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चित्रपटातील 'जली को आग कहते है, बुझी को राख कहते हैं, और जिस राख से बारुद बनता हैं उसे विश्वनाथ' कहते हैं अशा प्रसिद्ध डायलॉगच्या माध्यमातून महायुती उमेदवार विश्वनाथ भोईर यांचे कौतुक केले. तसेच या सभेला झालेली गर्दी पाहता विश्वनाथ भोईर यांचा विजय म्हणजे काळया दगडावरची भगवी रेघ असल्याचे सांगतानाच पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी गाफील न राहण्याचेही आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी केले.

तर राज्यामधील महिला भगिनींकडे जो वाकड्या नजरेने बघेल त्याचे बदलापूरच्या नराधमासारखेच परिणाम होतील. अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महिला वर्गाला संबोधित करताच टाळ्यांचा एकच कडकडाट झाला. तर भाजप(BJP) माजी आमदार नरेंद्र पवार, वरुण पाटील व शिवसेनेचे रवी पाटील यांचे महायुती धर्म पाळण्यासाठी व उमेदवारी अर्ज मागे घेतल्याबद्दल एकनाथ शिंदे यांनी जाहीर अभिनंदन केले.

फक्त विकास विकास आणि विकास हेच धोरण... -

कल्याणमध्ये विविध शासकीय संस्थांच्या माध्यमातून 2 हजार 40 कोटींची विकासकामे सुरू आहेत. ही कामं जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंतचा थोडी कळ सोसा. तर आधीच्या सभेमध्ये दिलेले कुशावली धरण, मुंबईच्या धर्तीवर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, विकासाच्या मुद्द्यावर जनतेसमोर, कल्याण पश्चिम विकास पाहता ती महायुती पाठीमागे उभी राहील आणि भरघोस मतांनी निवडून देईल, असा विश्वास उमेदवार विश्वनाथ भोईर यांनी यावेळी व्यक्त केला.

या सभेला भाजपचे ज्येष्ठ नेते जगन्नाथ पाटील, माजी मंत्री कपिल पाटील, कल्याण लोकसभेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जगन्नाथ शिंदे यांच्यासह महायुतीच्या मित्रपक्षातील प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT