Devendra Fadnavis | Eknath Shinde|
Devendra Fadnavis | Eknath Shinde| 
मुंबई

म्हणून मी मुख्यमंत्री झालो..; एकनाथ शिंदेचा मोठा खुलासा

सरकारनामा ब्युरो

मुंबई : गेल्या आठ-दहा दिवसांत राज्याच्या राजकारणात मोठ्या उलाथापालथी घडल्या. एकनाथ शिंदे यांच्यासह ४० हून अधिक आमदारांनी बंडखोरी केली. यामुळे महाविकास आघाडीचं सरकार अल्पमतात आलं आणि महाविकास आघाडी सरकार (Mahavikas Aghadi) कोसळले. उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला.

यानंतर एकनाथ शिंदे यांच्या गटाने भाजपने सोबत जाण्याचा निर्णय घेतला.अशातच भाजपकडून सुरु असलेल्या हालचाली पाहता भाजप मुख्यमंत्रीपदासाठी हे सर्व करत आहे आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) मुख्यमंत्री होतील, असा विश्वास राजकीय वर्तुळातून व्यक्त केला जात होता. मात्र ऐनवेळी फडणवीसांनी एकनाथ शिंदेंच्या नावाची मुख्यमंत्री म्हणून घोषणा केली आणि सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला.

एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची आणि देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. मात्र, फडणवीस यांना उपमुख्यमंत्री पद देण्याचा आणि मुख्यमंत्री पद एकनाथ शिंदे यांना देण्याचा निर्णय भाजपने का घेतला? असा प्रश्न उपस्थित होत आहे. शपथविधीच्या काही तास आधीपर्यंतही देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आणि एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री होतील, अशा चर्चा राज्यभरात सुरु होत्या. भाजपच्या आमदारांचं संख्याबळही शिंदे गटापेक्षा जास्त असल्याने मुख्यमंत्रीपद भाजपकडेच राहिल असंही बोलल जात होतं पण अचानक संपूर्ण डावच पलटला आणि भाजपने मुख्यमंत्रीपद एकनाथ शिंदे यांच्याकडे देण्याचा निर्णय घेतला.

यातही मोठा ट्विस्ट समोर आला आहे. आपण मुख्यमंत्री होणार असल्याची कल्पना स्वत: एकनाथ शिंदे यांनासुद्धा नव्हती. एका मुलाखतीमध्ये बोलताना एकनाथ शिंदे यांनी याबाबत खुलासा केला आहे. तुम्ही मुख्यमंत्री होणार असल्याच तुम्हाला कधी समजलं? असा सवाल एकनाथ शिंदे यांना विचारला असता ते म्हणाले, की 'मला हे सर्वकाही अनपेक्षित होतं. भाजप स्वतःला मुख्यमंत्रीपद मिळावं म्हणून फोडाफोडीचं राजकारण करत असल्याचा लोकांमध्ये समज होता. पण त्यांनी हा आरोप खोटा ठरवला. भाजपकडे आमच्यापेक्षा संख्याबळ जास्त असतानाही त्यांनी माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यावर विश्वास दाखवला.'

त्यानंतर देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्रीपद स्वीकारायला तयार कसे झाले, या प्रश्नावर उत्तर देताना एकनाथ शिंदेंनी सांगितलं की, 'भाजपमध्ये पक्षशिस्तीला फार महत्त्व आहे. मी मुख्यमंत्रीपदाबाबत देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोललो. त्यावर बोलताना ते म्हणाले की, ज्या पक्षानं मला सर्वोच्च पद दिलं. आज त्याच पक्षाने मला उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी दिली आहे. पक्षाचा आदेश असल्याने मी उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी स्वीकारली आहे.' असा खुलासा एकनाथ शिंदे यांनी सांगितलं.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT