Nana Patole

 

Sarkarnama

मुंबई

राज्यपालांचा अवमान होऊ नये म्हणून विधानसभा अध्यक्षांची निवडणूक पुढे ढकलली!

आपण जे नियम तयार केले आहेत, ते संविधानाला धरून नाहीत, असेही राज्यपालांचे मत आहे.

सरकारनामा ब्यूरो

मुंबई : राज्यपाल भगतसिंह कोशियारी (Bhagat Singh Koshiyari) यांची पत्रातील भूमिका आणि भावना समजून घेऊन त्यांचा कुठेही अपमान होता कामा नये. तसेच, कायद्याचा पेच निर्माण झाल्याने महाविकास आघाडी सरकारने विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली, असे स्पष्टीकरण काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी दिले आहे.

मिस्ड कॉल करा आणि गांधीदूत बना, अशी मोहिम काँग्रेस पक्षाने राज्यात सुरू केली आहे. त्याबाबत माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत प्रदेशाध्यक्ष नाना पटोले बोलत होते. ते म्हणाले की, विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक घेण्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपाल कोशियारी यांना पत्र लिहिले होते. सोमवारी (ता. २७ डिसेंबर) सायंकाळ सहापर्यंत प्रतिसाद आला नाही, तर राज्यपालांचा निवडणुकीस होकार आहे, असे समजले जाते, त्यानुसार आम्ही रात्री निवडणुकीची तयारी सुरू केली होती. मात्र, आज (ता. २८ डिसेंबर) सकाळी प्रक्रिया सुरू होणार तोच राज्यपालांचे पत्र आले. त्या पत्रातील राज्यपालांची भूमिका आणि भावना समजून घेऊन सरकारने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली.

राज्यपालांनी दोन वेळा पत्र लिहून विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक घेण्याची मागणी केली होती. पण, गेल्या दोन दिवसांपासून ज्या पद्धतीने पत्रव्यवहार सुरू आहे, तो पाहता कायद्याचा पेच निर्माण झाल्यामुळे ही निवडणूक पुढे ढकलली आहे. तसेच, राज्य सरकारने जे निमय बनवले आहेत, त्यावरून कायदेशीर पेचप्रसंग निर्माण होऊ शकतात, असे राज्यपालांचे म्हणणे आहे. आपण जे नियम तयार केले आहेत, ते संविधानाला धरून नाहीत, असेही त्यांचे मत आहे. पण यामागे भाजप आहे, असा माझा स्पष्ट आरोप आहे, असे पटोले म्हणाले.

देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत जे भाषण केले होते, तीच भाषा राज्यपालांच्या पत्राची होती, त्यामुळे ते भाजपचा अजेंडा पुढे रेटत आहे, असा आरोपही नाना पटोले यांनी केला. आवाजी मतदानपद्धतीबाबत पटोले म्हणाले की, विधानसभा अध्यक्षपद निवडीच्या प्रक्रियेसाठी दोन ते तीन दिवस लागतात, त्यामुळे मागील अधिवेशनात ही निवड करता आली नाही. कोरोनाचा काळ नसता तर मोठ्या कालावधीचे अधिवेशन घेऊन विधानसभा अध्यक्षपदाच्या माध्यमातून १७० चे बहुमत पुन्हा सिद्ध केले असते. विरोधकांनी मांडलेली भूमिका समजून घेऊन आम्ही वागतो. विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक फेब्रुवारीतील अधिवेशनात पहिल्याच आठवड्यात घेण्यात येईल.

कालीचरण महाराजांनी माफी मागण्यास नकार दिला आहे. त्याबाबत पटोले म्हणाले की, छत्तीसगड सरकारने आणि अकोल्यात त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. माफी मागायाचे की नाही, हा त्यांचा विचार आहे. पण अशा प्रवृत्तीच्या विरोधात काँग्रेस मैदानात उतरून उत्तर देणार आहे. आम्ही गांधी विचारांनुसार चालणार आहोत, असे या मोहिमेबाबत पटोले यांनी सांगितले.

भाजपकडून अशा बातम्या पेरल्या जातात

मालेगाव बॉम्बस्फोटप्रकणी पकडण्यात आलेल्या साक्षीदाराने सांगितले की, योगी आदित्यनाथ यांचे नाव घेण्यासाठी माझ्यावर दबाव होता. त्यावर ते म्हणाले की ही बातमी जुनी आहे. उत्तर प्रदेश व इतर राज्याच्या निवडणुका आल्यानंतर अशा बातम्या भाजपकडून पेरल्या जातात, असा आरोपही केला.

भाजपचे नेते भ्रमित झालेत

राज्यपालांची शिफारस डावलून विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक घेतली असती राज्यात राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची शिफारस केली असती का, यावर पटोले म्हणाले की, भाजपचे काही लोक राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची भाषा करत आहेत. मात्र लोकशाहीचे महत्व न मानणारे भाजपचे नेते भ्रमित झाले आहेत. भ्रमित झालेल्या लोकांच्या तोंडाला फार लागायचं नसतं. सर्व गोष्टींचा विचार करायचा असतो, तो आम्ही केला आहे.

दुटप्पीपणाची भूमिका

भाजपची भूमिका कायम दुटप्पीपणाची राहिली आहे. ओबीसी आरक्षणावरून मध्यप्रदेश सरकारला केंद्र सरकारकडून मदत केली जात आहे. मात्र, महाराष्ट्राला सापत्नपणाची वागणूक दिली जात आहे, असेही नाना यांनी या वेळी नमूद केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT