Pankaja Munde news| OBC Reservation|
Pankaja Munde news| OBC Reservation| 
मुंबई

ओबीसी आरक्षणासोबतच निवडणूका व्हाव्यात; पंकजा मुंडेंचे शिंदे-फडणीसांना साकडं...

सरकारनामा ब्युरो

मुंबई : राज्यात येत्या काही दिवसांमध्ये ९२ नगरपरिषदा आणि ४ नगरपंचायतींच्या निवडणुका होणार आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या (Supreme court) आदेशानुसार राज्यातील या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ओबीसी आरक्षणाशिवाय घेण्यात येणार आहेत. महाविकास आघाडी सरकारने न्यायालयात अचूक इम्पेरिकल डेटा सादर न केल्यामुळे ओबीसी आरक्षणाशिवाय प्रलंबित निवडणुका घेण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते.

या पार्श्वभूमीवर भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी, ‘ओबीसी आरक्षण देऊनच निवडणुका होतील, अशी खंबीर पावलं उचलावी’, अशी मागणी केली आहे. याबाबत पंकजा मुंडेंनी सूचक ट्वीटद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी केली आहे. “काही ठिकाणी नगरपालिका निवडणुका जाहीर झाल्या आहेत. नवनिर्वाचित मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी या गोष्टीची दखल घ्यावी आणि ओबीसी आरक्षण देऊनच निवडणुका होतील, अशी खंबीर पावलं उचलावी. सरकारकडून न्याय मिळेल हा विश्वास आहे”, असं ट्वीट पंकजा मुंडे यांनी केले आहे.

पुढील महिन्यात राज्यात नगरपरिषदा आणि नगरपंचायतीं निवडणुका होण्याची शक्यता आहे. मात्र अद्यापही ओबीसी आरक्षणाचा तिढा कायम आहे. ओबीसींच्या आरक्षणासाठी अनेकदा राज्यभरात ओबीसी समाजाने तीव्र आंदोलने केली होती. महाविकास आघाडीने राज्यातील ओबीसी आरक्षणाची हत्या केल्याची भाजपन नेत्यांनी टीका केल्या. देवेंद्र फडणवीसांसह, चंद्रकांत पाटील आदी भाजप नेते प्रचंड आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले.

आता राज्यात एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वात नवं सरकार आलं आहे. तरीही ओबीसी आरक्षणाविना या निवडणूका घ्याव्या लागणार आहेत, असे असताना आता पंकजा मुंडेंच्या मागणीवर भाजप काय भूमिका घेणार, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. पावसाचे नियोजन करून येत्या आठ ते पंधरा दिवसात निवडणुकांचे वेळापत्रक जाहीर करण्याचे आदेश न्यायालयाने राज्य सरकारला दिले आहेत.

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून पंकजा मुंडे यांनी राज्यातील राजकारणात सक्रीय नव्हत्या, विधानपरिषदेची उमेदवारी न मिळाल्याने पंकजा मुंडे नाराज असल्याच्या चर्चाही सुरु होत्या. मुंडेंच्या समर्थकांमध्येही ही नाराजी दिसून येत होती. मात्र महाविकास आघाडी सरकार अस्थिर झाल्याचं दिसताच त्या अचानक भाजपच्या बैठकांना हजेरी लावून लागल्या. आताही ओबीसी आरक्षणासाठी त्यांनी ट्विट करत शिंदे-फडणवीस सरकारकडे मागणी केली आहे. विशेष म्हणजे राज्यातील मंत्रिमंडळात पंकजा मुंडेंना संधी मिळणार असल्याचीही चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे. त्यामुळे शिंदे-फडणवीस सरकार पंकजा मुंडेच्या या मागणीचा प्रतिसाद का देणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT