Devendra Fadnavis, Ajit Pawar, Eknath Shinde Sarkarnama
मुंबई

Palghar Politics News : पालघरमध्ये आदिवासी संघटनांचा 'एल्गार' तर मुख्यमंत्री ,उपमुख्यमंत्र्यांसह केंद्रीय मंत्री 'जव्हार'मध्ये !

Political News : ...तर त्याचवेळी राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्री आदिवासी दिन साजरा करण्यासाठी जव्हारला येत आहेत.

सरकारनामा ब्यूरो

संदीप पंडित

Virar : मणिपूरच्या घटनेचे ठिकठिकाणी पडसाद उमटत असून, त्याचा निषेध करण्यात येत आहे. ९ ऑगस्टला आदिवासी दिन असून यादिवशी पालघरमधील आदिवासींच्या वेगवेगळ्या संघटना एकत्र येत असून त्या मणिपूरमधील आदिवासींवर झालेल्या घटनेचा निषेध करून त्या विरोधात एल्गार पुकारणार आहेत.

तर त्याचवेळी राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्री आदिवासी दिन साजरा करण्यासाठी जव्हारला येत आहेत. त्यामुळे खरे आदिवासी कुठे हजेरी लावतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

पालघर(Palghar) हा आदिवासी बहुल जिल्हा असून याठिकाणी मोठ्या प्रमाणावर आदिवासी असून ,ते वेगवेगळ्या पक्षात विखुरले असले तरी मणिपूरमध्ये आदिवासींवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधासाठी ते एकत्र येणार असल्याचे सांगितले जात आहे. यासाठी संयुक्त आदिवासी हक्क संरक्षण समिती, आदिवासी एकता परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यातील आदिवासींच्या 34 संघटना एकत्र आल्या असून तालुका पातळीवर वेगवेगळ्या रॅली न काढता एक जिल्हा एक रॅली काढण्याचे ठरविण्यात आले आहे.

बिरसा मुंडा चौक येथून सुरू होऊन आर्यन हायस्कूलच्या मैदानात समारोप होणार आहे. यासाठी पालघरमध्ये आदिवासींचे ज्येष्ठ नेते काळूराम धोदडे ,आमदार विनोद निकोले, डॉ. सुनील पराड, डॉ. विश्वास वळवी आदी नेते एकत्र आले आहेत. परंतू, पालघरमध्ये आदिवासींची महत्वाची संघटना असलेली श्रमजीवी संघटना तालुका तालुक्यात आदिवासी दिन साजरा करणार आहे.

जागतिक आदिवासी दिन हा आनंद उत्सव म्हणून साजरा केला जातो. मात्र, मणिपूर(Manipur) येथे 4 मे 2023 ला दोन महिलांचे बाबतीत जी घटना घडली. त्या घटनेने भारताची मान संपूर्ण जगभरात झुकवली आहे. या घटनेचा निषेध 9 ऑगस्टला संपूर्ण देशभरात करण्यात येणार आहे. गावपातळीवर सुद्धा कार्यक्रम होणार असून तिथेही निदर्शने करण्यात येणार आहेत. यावेळी काळे कपडे घालून निषेध केला जाणार आहे असे आमदार विनोद निकोले यांनी या रॅलीबाबत सांगितले.

एका बाजूला आदिवासींच्या सर्वच संघटना एकत्र येत मणिपूरच्या घटनेचा निषेद करणार असतानाच दुसऱ्या बाजूला मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(Eknath Shinde),उपमुख्यमंत्री अजित पावले, देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री कपिल पाटील, आदिवासी विकासमंत्री डॉ. विजयकुमार गावित ,पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्यासह अनेक आमदार जव्हारमध्ये आदिवासी दिन साजरा करण्यासाठी एकत्र येत असल्याने आदिवासी कोणत्या कार्यक्रमाला हजेरी लावतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

(Edited By Deepak Kulkarni)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT