Bacchu Kadu
Bacchu Kadu Sarkarnama
मुंबई

शिंदे गटातून 40 आमदार गेले तरी धोका नाही, भाजप-अपक्ष मिळून सरकार बनवू : बच्चू कडू

सरकारनामा ब्यूरो

मुंबई : राज्यात सत्तातर होऊन महिना झाला तरीही, मंत्रीमंडळाचा विस्तार झाला नाही. मंत्रीमंडळ विस्तार कधी होणार, असा प्रश्न विरोधकाकडून शिंदे सरकारला सतत विचारला जात आहे. तर दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (eknath shinde) हे लवकरच मंत्रीमंडळाचा विस्तार होईल, असे सांगत आहे. अशा परिस्थितीत शिंदे गटातील आमदार बच्चू कडू (bachchu kadu) यांनी एक विधान करुन खळबळ उडवून दिली आहे. ते एका वृत्तवाहिनीशी बोलत होते. (Bacchu Kadu latest news)

"शिवसेनेचे 40 आमदार गेले तरी सुध्दा भाजप आणि अपक्ष मिळून सरकार बनवू शकतो. त्यामुळे राज्य सरकारला कोणताही धोका नाही," असे विधान बच्चू कडू यांनी केले आहे. त्यामुळे राज्याचे राजकारण आता कुठल्या दिशेला जाणार, असा प्रश्न सामान्यांना पडला आहे.

"मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या दोन मंत्र्यांचे सरकार सध्या राज्यात आहे. हे आजच नाही तर यापूर्वीही असे सरकार सत्तेत होते. त्यामुळे दोघेही राज्य सांभाळण्यासाठी सक्षम आहेत. त्यांच्यासमोर अनेक अडचणी असल्याने मंत्रिमंडळ विस्तार लांबणीवर पडला आहे,"असे त्यांनी सांगितले.

"मंत्रिमंडळ विस्तार झाला नसला तरी शेतकऱ्यांचे काही नुकसान होऊ दिले नाही त्यांना विविध सवलती देण्याची घोषणा राज्य सरकार करत आहे. शेतकऱ्यांना मदत भेटली नाही असे होणार नाही, असे झाल्यास सर्वप्रथम आम्ही शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहू मग सरकारच्या,"असे बच्चू कडू म्हणाले.

नाना पटोलेंना प्रत्युत्तर

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दोन मंत्र्यांचे शिंदे-फडणवीस सरकार अंपग असल्याची टीका केली होती. या टीकेचा समाचार बच्चू कडू यांनी घेतला. बच्चू कडू म्हणाले, "दिव्यांगांना कमजोर समजणे म्हणजे नाना पटोले यांचा नासमजपणा आहे. ते लोक तुमच्यापेक्षाही सक्षम आहेत. नानांनी आपले शब्द मागे घ्यावे," नाना पटोलेंच्या विधानाचा कडूंनी यावेळी निषेध केला.

आंदोलनाची गरज नाही..

अजित पवार यांनी राज्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याच्या मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे. यावर बच्चू कडू म्हणाले, "राज्यात अतिवृष्टी झाली, मात्र नियमानुसारचं ओला दुष्काळ जाहीर केला जातो. त्यानुसार दुष्काळ जाहीर केला जाईल. याची कल्पना विरोधी पक्षनेते अजित पवारांना कल्पना आहे. सरकारने शेतकऱ्यांसाठी मदतीची घोषणा केल्याने आंदोलनाची गरज नाही,"

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT