Nana Patole & Nawab Malik Sarkarnama
मुंबई

`हमीभावाचा `फूल प्रुफ` कायदा येईपर्यंत शेतकऱ्यांना खरा न्याय मिळणार नाही`

केद्रीय गृहराज्य मंत्र्याच्या मुलाने शेतकरी व पत्रकराला गाडीखाली चिरडून मारले. त्या मंत्र्यांची हकालपट्टी अजून झालेली नाही.

सरकारनामा ब्यूरो

मुंबई : केंद्रातील भाजपाच्या (BJP) सरकारने (Central Government) अन्नदात्याची मोठी हालअपेष्टा केली. सत्तेत येण्यापूर्वी मोठी आश्वासने दिली पण सत्तेत येताच शेतकऱ्यांच्या मुळावर उठले. तीन कृषी काळे कायदे (Farm Laws) आणून शेतकऱ्यांना संपवण्याचे षडयंत्र आखले होते. त्याला विरोध करत शेतकऱ्यांनी वर्षभर आंदोलन केले. अखेर कायदे मागे घेत असल्याची घोषणा सरकारला करावी लागली. मात्र, या सरकारवर शेतकऱ्यांचा विश्वास नाही, यामुळे जोपर्यंत संसदेत हे कायदे रद्द करून शेतकऱ्यांसाठी हमीभावाचा फुलप्रुफ कायदा सरकार आणत नाही तोपर्यंत शेतकऱ्यांना खरा न्याय मिळणार नाही, असे मत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस (Congress) कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी व्यक्त केले.

संयुक्त शेतकरी कामगार मोर्चा महाराष्ट्रने २७ व २८ नोव्हेंबर दरम्यान शहीद किसान अस्थिकलश मानवंदना व संयुक्त शेतकरी कामगार महापंचायतीचे आयोजन केले आहे. यासंदर्भातील आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी राष्ट्रवादीचे नेते व मंत्री नवाब मलिक, प्रकाश रेड्डी, काँग्रसचे सरचिटणीस व मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे, भाकपा, माकप, जनता दल, समाजवादी पक्ष व इतर समविचारी पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

पटोले म्हणाले, काळ्या कायद्यांविरोधातील लढाईत शेतकऱ्याला मोठी किंमत मोजावी लागली आहे. वर्षभर हा संघर्ष चालला त्यात ७०० शेतकऱ्यांचा बळी गेला. शेतकऱ्यांवर मोदी सरकारने प्रचंड अत्याचार केले. लाल किल्ल्याचे प्रकरण पुढे करुन त्यांच्यावर गुन्हे दाखल केले. तर लखमीपूर खेरीमध्ये मोदी सरकारमधील गृहराज्यमंत्र्याच्या मुलाने शेतकरी व एका पत्रकराला गाडीखाली चिरडून मारले. त्या मंत्र्यांची हकालपट्टी अजून झालेली नाही, ती झाली पाहिजे. देश व लोकशाही वाचवण्यासाठी ही लढाई सुरु असल्याचे त्यांनी सांगितले.

नवाब मलिक म्हणाले, शेतकऱ्यांनी मोदींना मागे हटवण्यास प्रवृत्त करुन कायदे रद्द करण्यास भाग पाडले. मात्र, त्यासाठी ७०० शेतकऱ्यांना प्राण गमवावे लागले. आगामी उत्तर प्रदेश, पंजाबमधील निवडणुकीत भाजपाचा पराभव दिसत असल्यामुळे हे कायदे रद्द करण्याचा निर्णय घ्यावा लागला आहे. मात्र, शेतकऱ्यांच्या मागण्या अजून पूर्ण झालेल्या नाहीत. एमएसपीचा कायदा बनवला पाहिजे, शेतकऱ्यांना स्वस्त वीज मिळाली पाहिजे तसेच, आंदोलना दरम्यान मृत झालेल्या शेतकऱ्यांच्या वारसांना प्रत्येकी एक कोटी रुपये द्यावेत. भाजपा हा शेतकऱ्यांचा पक्ष नाही तो शेतकऱ्यांना लुटणारा पक्ष आहे, असा घणाघातही मलिकांनी यावेळी केला.

प्रकाश रेड्डी म्हणाले की, लखीमपूर खेरी मधील हुतात्मा शेतकऱ्यांचा अस्थिकलश महाराष्ट्रात आणला जात आहे. २७ नोव्हेंबरला तो मुंबईतील शिवाजी पार्क, चैत्यभूमी, बाबू गेणू स्मारक, हुतात्मा चौक या पवित्र ठिकाणी नेण्यात येणार असून महात्मा गांधीजींच्या पुतळ्याजवळ त्याचा समारोप होईल. तर, २८ तारखेला संयुक्त किसान मोर्चा आयोजित मेळावा होत आहे. या मेळाव्याला संयुक्त किसान मोर्चाचे नेते राकेश टिकैत, डॉ. दर्शन पाल, हनन मुल्ला हे मार्गदर्शन करणार आहेत. यावेळी काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना इतर राजकीय पक्ष शेतकरी व कामगारही मोठ्या संख्येने उपस्थित राहतील.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT