freedom Fighter Sopanrao Ghorpade passed away
freedom Fighter Sopanrao Ghorpade passed away 
मुंबई

क्रांतीसिंह नाना पाटलांचा मोहरा हरपला

सरकारनामा ब्यूरो

सातारा : भारतीय स्वातंत्र्य संग्रामातील ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक व प्रतिसरकारमधील रहिमतपुर गटाचे प्रमुख सोपानराव घोरपडे उर्फ आप्पा (वय 101) यांचे आज पहाटे रहिमतपूर येथे निधन झाले. त्याचे मागे नातू राजू व कन्या असा परिवार आहे. घोरपडे यांच्या जाण्याने प्रतिसरकारच्या चळवळीतील सातारा जिल्ह्यातील अखेरचा दुवा निखळला आहे. 

सोपानराव घोरपडे हे क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या नेतृत्वाखालील प्रतिसरकार चळवळीत सक्रिय सहभागी होते. त्यांना स्वातंत्र्य चळवळीच्या काळात अनेकदा कारावास भोगावा लागला होता. 1936 ते 1938 या कालावधीत त्यांनी विद्यार्थी संघटना स्थापन करून विद्यार्थ्यांमध्ये व जनतेमध्ये स्वातंत्र्याचे बीज रोवण्याचे काम केले.

त्यांचे मुळगाव रहिमतपूर जवळील गोजेगाव. परंतु ते आजोळी म्हणजेच रहिमतपूर येथे राहात होते. रामगड कॉंग्रेस अधिवेशनातील ठराव जनतेमध्ये  पोचविण्यासाठी त्यांनी जनजागृतीचा सपाटा लावला होता. खटाव तालुक्‍यातील पुसेगांव येथील सरकारी कचेरी जाळल्याप्रकरणी त्यांना त्याकाळी अटक झाली होती. प्रारंभीच्या काळात शेतकरी कामगार पक्ष आणि त्यानंतर भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस यांच्या माध्यमातून त्यांनी राजकारणात सक्रिय काम केले.

रहिमतपूर नगर परिषदेवर ते दोन वेळा निवडून आले होते. परंतु राजकारणापेक्षा समाजातील कष्टकरी, शेतकरी, शेतमजूर यांच्या हिताच्या बाजूने त्यांनी भूमिका बजावली. सातारा येथील नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा पुतळा उभारणीत त्यांनी आपल्या सहकाऱ्यांसमवेत मोलाचे योगदान दिले. पाचगणी येथे महात्मा गांधीचे स्मारक व्हावे, म्हणून गेली सतरा वर्षे प्रयत्नशिल होते.

तसेच स्वातंत्र्य सैनिकांचे प्रश्‍न सोडविण्यासाठी त्यांनी आयुष्य वेचले. त्याचबरोबर चले जाव चळवळीचे सातारा येथे स्मारक  होण्याबाबत ते नेहमीच आग्रही होते. त्यासाठी त्यांनी अनेकांना बरोबर घेऊन सरकार दप्तरी प्रयत्न केले होते. सातारा जिल्हा स्वातंत्र्य सैनिक संग्राम संघटनेचे ते अध्यक्ष होते. अनेक युवकांना मार्गदर्शन करण्यात ते नेहमीच आग्रही असत. त्यांच्या निधनाने प्रतिसरकारच्या चळवळीतील पश्‍चिम महाराष्ट्रातील शेवटचा दुवा
निखळला आहे. 


 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT