Amit Shah Sarkarnama
मुंबई

Amit Shah : गणेश नाईकांचा आमदार म्हात्रेंच्या मतदारसंघावर दावा; शाहांचा दौरा नाईक पिता-पुत्रांसाठी फलदायी?

BJP leader Amit Shah visits Mumbai and Navi Mumbai : भाजप नेते केंद्रीय मंत्री अमित शहा मुंबई आणि नवी मुंबई इथं दौऱ्यावर येत असून, भाजप नेते गणेश नाईक आणि संदीप नाईक यांच्या शक्तीप्रदर्शनाकडे लक्ष लागलं आहे.

Pradeep Pendhare

Mumbai News : भाजप नेते अमित शाह मुंबई दौऱ्यावर येत आहेत. विधानसभा निवडणुकीच्या तयारीचा भाग म्हणून, अमित शाह यांचा हा दौरा भाजप महायुतीसाठी खूप महत्त्वाचा मानला जात आहे. अमित शाह या दौऱ्यानिमित्ताने मुंबई आणि नवी मुंबईतील पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेणार आहेत.

अमित शाह यांचा दौरा यशस्वी व्हावा, याची जबाबदारी निमंत्रक भाजपचे जिल्हाध्यक्ष संदीप नाईक, भाजप नेते गणेश नाईक आणि सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडे असून, तिघांपैकी सर्वाधिक संदीप नाईक यांनी शक्तीप्रदर्शन चालवले असल्याने नियोजनाच्या केंद्रस्थानी ते आले आहेत.

भाजप (BJP) नेते गणेश नाईक यांनी नवी मुंबईतील ऐरोली आणि बेलापूर या दोन्ही विधानसभा मतदारसंघांवर दावा सांगितल्याने शहरातील राजकीय वातावरण एकीकडे ढवळून निघाले आहे. यातच अमित शाह यांचा मुंबई आणि नवी मुंबई दौरा होत आहे. या दौऱ्याची जबाबदारी नाईक पिता-पुत्रांवर आहे. या दौऱ्याचे नियोजन नाईक पिता-पुत्रांवर देत भाजपने यात 'पॉलिटिक्स' करत समन्वय साधण्याचा प्रयत्न केला आहे.

भाजप नेते गणेश नाईक (Ganesh Naik) यांनी नवी मुंबईतील ऐरोली आणि बेलापूर जागांवर दावा सांगितला आहे. बेलापूर विधानसभा मतदारसंघात भाजपच्या मंदा म्हात्रे दोन टर्म आमदार आहेत. बेलापूरमधून यंदा गणेश नाईक यांचे पुत्र संदीप नाईक यांनी जोरदार तयारी केली आहे. या जागा वाटपावरून स्थानिक पातळीवर वाद नको म्हणून भाजपने नाईक पिता-पुत्रांना थेट पक्षश्रेष्ठींच्या दरबारात मोठेपणा दिला आहे. तिथं तोडगा काढण्याचे अप्रत्यक्ष संकेत नाईक पिता-पुत्रांना दिले आहेत. त्यामुळे नाईकांसाठी अमित शाह (Amit Shah) यांचा दौरा महत्त्वाचा असणार आहे.

आमदार म्हात्रे आणि नाईक संघर्ष

अमित शाह यांच्या दौऱ्याचे निमंत्रक तथा जिल्हाध्यक्ष संदीप नाईक यांनी बेलापूर विधानसभा मतदारसंघावर दावा केला आहे. तसे त्यांनी दौरे देखील वाढवले आहेत. या ठिकाणी भाजपच्या मंदा म्हात्रे गेल्या दोन टर्म आमदार आहेत. त्यामुळे भाजपमध्ये या जागेवरून संदीप नाईक आणि मंदा म्हात्रे यांच्या संघर्ष उफाळला आहे. यावर अमित शाह काय तोडगा काढतात, याकडे लक्ष लागलं असून उत्सुकता वाढली आहे.

शाहांच्या दौऱ्यात नाईकांचे शक्तीप्रदर्शन

संदीप नाईक यांनी यंदा निवडणूक कोणत्याही परिस्थिती लढवायचीच, असा चंग बांधला आहे. त्यामुळे अमित शाह यांचा हा दौरा त्यांच्या पथ्यावर पडणार असल्याची चर्चा आहे. नवी मुंबईत नाईकांनी दोन जागा मागितल्या आहेत. भाजपने यावर विचार न केल्यास ते टोकाची भूमिका घेतील, असे देखील अंदाज वर्तवला जात आहे. यातच अमित शाह यांच्या दौऱ्याची जबाबदारी संदीप नाईक यांच्याकडे असल्याने, हा दौऱ्यात त्यांनी शक्तीप्रदर्शनावर भर दिला आहे.

अमित शाह यांच्या जोर'बैठका'

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह मुंबई आणि नवी मुंबईत भाजप पदाधिकाऱ्यांची बैठक घेतील. नवी मुंबईत होणाऱ्या बैठकीस ठाणे, पालघर जिल्ह्यासह कोकण विभागातील प्रमुख पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. यावेळी अमित शाह मतदारसंघनिहाय आढावा घेणार असल्याचे सांगितले जाते. कौपरखैरणे इथल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसोबत बैठक घेणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT