मुंबई : पाच राज्यांच्या निवडणुकांची घोषणा झाल्यावर शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी गोवा आणि उत्तर प्रदेशातील काही जागांवर शिवसेना निवडणूक लढवणार असल्याचे सांगितले आहे. त्याचबरोबर इतर राज्यातही महाविकास आघाडी स्थापन करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचा दावाही त्यांनी केला. आज त्यांनी 'रोखठोक'मधून त्यावर भाष्य केलं आहे.
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या कार्यशैलीचं नेहमी कौतुक करणाऱ्या शिवसेना खासदार संजय राऊत यांनी गोव्यातील राजकारणावरुन त्यांच्यावर टीका केली आहे. शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या 'सामना'मधील 'रोखठोक' सदरामधून संजय राऊत यांनी ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांना खडे बोल सुनावले आहे. ''अस्थिर लोकांना घेऊन ममता बॅनर्जी यांना गोव्यातील सत्तेचं स्वप्न पडतंय, हे त्यांच्या प्रतिमेस शोभणारं नाही,'' अशा शब्दांत राऊत यांनी टीका केली आहे.
''अस्थिर लोकांना घेऊन ममता बॅनर्जी यांना गोव्यातील नव्या सकाळचे स्वप्न पडले आहे. हे त्यांच्या प्रतिमेस शोभणारे नाही. गोव्यात काँग्रेसचे अस्तित्व शिल्लक ठेवायचे नाही ही भूमिका पंतप्रधान मोदी किंवा भारतीय जनता पक्षाची असू शकते, पण भाजपशी लढणाऱ्या ममता बॅनर्जीही त्याच काँग्रेसविरोधी भूमिकेस पाठबळ देतात. याचा फायदा शेवटी कोणाला होणार?,” असा प्रश्न संजय राऊतांनी उपस्थित केला आहे.
संजय राऊत म्हणाले, “गोव्यातील भाजपाचे आमदार व संभाव्य उमेदवार हे एकजात हिस्ट्री-शिटर्स आहेत. अफू-चरसचा व्यापार करणारे लोक उघडपणे भाजपात प्रवेश करतात व मुख्यमंत्री सावंत त्यांचे स्वागत करतात असे चित्र रोज दिसते. प्रत्येक जण सौदेबाजी करीत आहे. गोव्यात एका बाजूला मंदिरे तर दुसऱ्या बाजूला भव्य चर्च आहेत. दोन्ही प्रार्थनास्थळांत घंटानादाचे महत्त्व आहे. या घंटा आता धोक्याच्या ठरू नयेत इतके गोव्याचे राजकीय वातावरण बिघडले आहे,”
“देशाच्या राजकारणाचा कसा चुथडा झाला आहे ते पाहायचे असेल तर गोव्याकडे पाहावे. देवांचे गाव. भाऊसाहेब बांदोडकरांपासून बा. भ. बोरकरांपर्यंत लोकांचे पापभिरू राज्य. त्या गोव्यात आज काय सुरू आहे?,” असा संताप संजय राऊतांनी व्यक्त केला आहे.
“काँग्रेस पक्षाकडे मागच्या निवडणुकीनंतर 17 आमदार होते. ते आता 2 राहिले. बाकी सगळे पळून गेले. कारण गोव्यात काँग्रेसचे सक्षम नेतृत्व नाही. राष्ट्रीय भूमिका घेऊन गोव्यात निवडणुका लढवल्या जात नाहीत. दिल्लीच्या राजकारणाशी गोव्याचे नाते कधीच नव्हते. मनोहर पर्रीकर संरक्षणमंत्री म्हणून गेले, पण मनाने गोव्याच्या समुद्रकिनाऱ्यावर घुटमळत राहिले. त्यामुळे तृणमूल, आपसारखे पक्ष बाहेरून येऊन गोव्याला धडे देत आहेत. ‘आप’चे लोक आता गोव्यात स्थानिकांना 80 टक्के नोकऱ्या राखीव ठेवण्याचा प्रचार करीत आहेत,” अशी टीका संजय राऊतांनी केली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.