Sadabhau Khot,Gopichand Padalkar
Sadabhau Khot,Gopichand Padalkar sarkarnama
मुंबई

गेले पंधरा दिवस चांदण्या पाहत झोपणारे पडळकर, खोत पुन्हा आपल्या घराकडे!

ज्ञानेश सावंत

मुंबई : एसटी कर्मचाऱ्यांनी (ST strike) पुकारलेले आंदोलन 'हायजॅक' करीत आंदोलनकर्त्यांसोबत आझाद मैदानात मुक्कम ठोकलेले आमदार सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) आणि गोपीचंद पडळकरांनी (Gopichand Padalkar) आंदोलनातून माघार घेतल्यानंतर ते दोघेही आता पुन्हा निवांत झाले आहेत. खोत यांनी आज मुंबईतील आमदार निवासातील आपल्या खोलीत मुक्काम केला. तर पडळकर हे पुन्हा १५ दिवसांनंतर गुरुवारी घरी परतले.

राज्य सराकरमध्ये विलिनीकरणासह पगारवाढीसाठी राज्यभरातील एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलन सुरू केले आणि त्यात हे दोघे सहभागी झाली. आझाद मैदानातील आंदोलन त्यांनी पुकारले आणि तेथेच ठाण मांडून बसले. त्यामुळे हे दोघेच आंदोलनाचा चेहरा बनले. एसटी कर्मचारी संघटनांचे नेते कुठे आहेत, असा सवाल त्यामुळे पडला. सरकार विलीनीकरणाच्या चर्चेस तयार होईपर्यंत या दोघांनी तेथेच मुक्काम ठोकला. गेले 15 दिवस ते मैदानातच झोपत होते. खोत आणि पडळकर यांना आंदोलनाची सवय असल्याने त्यांनी पंधरा दिवस कर्मचाऱ्यांना तेथे विविध कार्यक्रम देऊन त्यांना सक्रिय ठेवले. भाजपचे दोन आमदार आंदोलनात सहभागी असल्याने पक्षानेही तेथे चांगली रसद पुरवली.

परिवहनमंत्री अनिल परब यांनी पगारवाढीची घोषणा केल्यानंतर हे आंदोलन कसे मागे घ्यायचे यावरून या दोघांची कोंडी झाली. सुरवातीला आक्रमक मागणी करत विलीनीकरणाशिवाय चर्चाच नसल्याचे सांगितल्याने माघार घेताना त्यांना बरीच सारवासारव करावी लागली. मात्र हे आंदोलन अधिक ताणण्यात अर्थ नाही, असे समजून त्यांनी तेथील आपला बाडबिस्तरा हलवला.

खोत हे गुरूवारी मुंबईतच आमदार निवासात मुक्कामास राहिले. आम्ही आमच्या परीने कर्मचाऱ्यांसाठी करण्याचा प्रयत्न केला. आझाद मैदानातील ते पंधरा दिवस कसे गेले ते कळालेही नाही. आंदोलन जिवंत ठेवले. मात्र न्यायालयाचा निर्णय होईपर्यंत विलीनीकरणाची वाट पाहण्याशिवाय पर्याय नाही. त्यामुळे आम्ही कर्मचाऱ्यांंना आंदोलनातून बाहेर पडत असल्याचे सांगितले. गेले 15 दिवस चांदण्यांखाली झोपलो होतो आता पंधरा दिवसांनंतर चार भिंतींच्या आता झोपायला मिळत आहे.

पडळकर म्हणाले, "सरकारने घेतलेली भूमिका कर्मचाऱ्यांपुढे मांडली, मात्र, त्यांची प्रमुख मागणी मान्य न झाल्याने ते आंदोलन करीत आहेत. मात्र, आंदोलनात न राहाता घरी निघालो आहे. परंतु, यापुढेही आम्ही कर्मचाऱ्यांसोबत राहणार आहोत.`` पडळकर यांचे आटपाडी तालुक्यातील झरे येथे घर आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT