Devendra Fadnavis Rajasthan Visit Sarkarnama
मुंबई

Devendra Fadnavis Rajasthan Daura: आरक्षणावरून राजकारण तापलं; फडणवीस मात्र राजस्थान दौऱ्यावर

अनुराधा धावडे

सचिन फुलपगारे

Mumbai News : मराठा आरक्षणावरून राज्यातील वातावरण तापले आहे. ठिकठिकाणी आंदोलनं आणि रास्ता रोको करण्यात येत आहेत. मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांचे जालन्यात उपोषण सुरू असून, त्यांनी आणखी आक्रमक भूमिका घेतली आहे. दुसरीकडे ओबीसींनी आंदोलने सुरू केली आहेत. धनगर आरक्षणाचा मुद्दाही तापत आहे. राज्यात अशी परिस्थिती असताना कायदा व सुव्यवस्थेची जबाबदारी असलेले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मात्र तीन दिवसांच्या राजस्थान दौऱ्यावर गेले आहेत.

मराठा आरक्षणावरून गेल्या काही दिवसांपासून राज्यातील वातावरण तापलं आहे. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर राज्यातील सर्वपक्षीय नेत्यांची सोमवारी बैठकही झाली, तर जालन्यात उपोषणाला बसलेले मनोज जरांगे पाटील यांनी आणखी आक्रमक भूमिका घेत राज्य सरकार समोर ५ मागण्या ठेवल्या आणि एक महिन्याची मुदत दिली आहे. आता राज्य सरकार काय भूमिका घेणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

मराठा आरक्षणाचा मुद्दा तापलेला असताना राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे राजस्थानमध्ये निवडणुकीच्या प्रचारासाठी गेले आहेत. देवेंद्र फडणवीस हे आजपासून तीन दिवस म्हणजे १२ ते १४ सप्टेंबरपर्यंत राजस्थान दौऱ्यावर असणार आहेत.

देशातील विविध राज्यांतील प्रचाराची जबाबदारी भाजपकडून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर सोपवण्यात येते. यापूर्वी बिहारच्या प्रभारीपदाची जबाबदारी देवेंद्र फडणवीसांकडे होती. त्या ठिकाणी भाजपने सत्तास्थापन केली होती. त्यानंतर गोव्यातही त्यांनी चुणूक दाखवून एकहाती सत्ता आणली होती. आता त्यांच्यावर राजस्थानातील प्रचाराची जबाबदारी टाकण्यात आली आहे.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सप्टेंबर महिन्यामध्ये ५ ते ६ दिवस प्रचारासाठी राज्याबाहेर असणार आहेत. १२ ते १४ सप्टेंबर रोजी ते राजस्थानात प्रचार दौरा करणार आहेत. त्यासोबतच ते येत्या काळात इतर राज्यांमध्येही प्रचार दौरे करणार आहेत.

फडणवीस हे १२ ते १४ सप्टेंबर दरम्यान राजस्थानमध्ये पदयात्रा आणि जाहीर सभांना संबोधित करतील, तर १८ सप्टेंबर रोजी मध्य प्रदेश दौरा करणार आहेत. २२ किंवा २३ सप्टेंबर रोजी ते छत्तीसगडच्या दौऱ्यावर जाणार आहेत. मध्य प्रदेशमध्ये भाजपची जनसंवाद यात्रा सुरू आहे. त्यात फडणवीस सहभाग नोंदवणार आहेत. महाराष्ट्रात मराठा आरक्षणावरून वातावरण तापलेलं असताना देवेंद्र फडणवीसांच्या इतर राज्यांच्या दौऱ्यांवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

Edited By-Anuradha Dhawade

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT