Gulabrao Patil, Aditya Thackeray Sarkarnama
मुंबई

Gulabrao Patil In Session : "शेतकऱ्याचा पोट्ट्या हाय..."; गुलाबराव पाटलांनी दंड थोपटतच आदित्य ठाकरेंना सुनावले

सरकारनामा ब्यूरो

Mumbai News : शिवसेनेतील बंडापासून ठाकरे आणि शिंदे गटातील संघर्ष अजूनही सुरूच असून, तो अधिवेशनातही वाढणार असल्याची चाहूलही पहिल्याच दिवशी आली होती. या दोन्ही गटात वारंवार कुठल्या ना कुठल्या मुद्द्यांवरून ओरखाडे काढताना दिसत आहेत. अधिवेशनात शुक्रवारी आदित्य ठाकरे यांनी पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटलांच्या अभ्यासावरून टोलेबाजी केली. त्यावर गुलाबराव पाटलांनीही आपल्या खास शैलीत परतफेड केली. त्यामुळे आदित्य आणि पाटलांमधील घमासनाची चर्चा विधानभवनात रंगली होती. (Latest Political News)

आदित्य यांनी मंत्र्याकडून माहितीपूर्ण उत्तर मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली. मात्र ती पूर्ण होत नसल्याची तक्रारही केली. ठाकरे म्हणाले, "मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांचा भार कमी होण्यासाठी अधिवेशन सुरू होण्यापूर्वी तात्पुरते खातेवाटप होते. मात्र प्रत्येक दिवशी हे खातेवाटप बदलू नये, असा नियम काढण्याची विनंती आहे. त्यामुळे संबंधित मंत्र्यांना उत्तरे देता येत नाहीत आणि बाहेर टिंगल होते. आम्ही सगळे आपापल्या मतदारसंघाला आणि महाराष्ट्राला आवाहन देत असतो. मात्र एखाद्या मंत्र्याला उत्तर देता आले नाहीतर 'टाइमपास' होतो. सकाळी लक्षवेधीत उपस्थित केलेल्या प्रश्नांवर उत्तर देताना संबंधित मंत्र्याचा अभ्यास पक्का असावा."

आदित्य आपल्या अभ्यासावरच बोलल्याचे पाहून मंत्री गुलाबराब पाटील आक्रमक झाले. पाटील म्हणाले, "आदित्य ठाकरे फार अभ्यास करून आलेले आहेत. मूळ प्रश्नांची उत्तर उपमुख्यमंत्र्यांनी दिलेले आहेत. मी विमानतळांच्या स्थितीची माहिती घेतली आहे. राज्यातील विमानतळांबाबत विचारलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे देण्यात आलेली आहे. मात्र सोलापूरमधील चिमणी का पाडली, याबाबत मला काही माहिती नाही. विमानतळाव्यक्तरिक्त इतर प्रश्न कुणी ऐनवेळी उपस्थित करून उत्तरांची अपेक्षा करीत असतील तर हे चुकीचे आहे."

यावेळी चिडलेल्या गुलाबराव पाटलांनी सभागृहातच आदित्य ठाकरेंना दंड थोपटत आपण शेतकऱ्याचा मुलगा असून कुठे काय करायचे म्हणत आव्हानही दिले. पाटील म्हणाले, ऐनवेळी उपस्थिती केलेल्या प्रश्नांबाबत कुठल्याही मंत्र्यांकडे माहिती अपूर्णच राहणार आहे. मायेच्या पोटी कुणी हुशार होऊन जन्माला येत नाही. त्यामुळे कुणी म्हणत असेल की मी बाळ हुशार आहे, तर मीही शेतकऱ्याचा पोट्ट्या आहे. कुठल्या जमीनीत काय पीक घ्यायचे हे मला चांगले माहिती आहे."

आदित्य ठाकरे गुलाबराव पाटलांच्या अभ्यासावर बोलल्याने दोघांत शाब्दिक चकमक झाल्याने सभागृहात गदारोळ उडाला होता. त्यावेळी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी सर्व सदस्यांना खाली बसण्याची विनंती केली. यासाठी त्यांना उभे राहावे लागले. यानंतरही विरोधक आक्रमक झालेले पाहायला मिळाले. सभागृहाचे कामकाज चांगल्या पद्धतीने सुरू असून यापुढेही असेच सुरू ठेवू, असे आवाहन नार्वेकर यांनी दिले. तसेच मंत्र्याकडे पुरेशी माहिती नसेल तर मी मध्यस्थी करेन, असेही त्यांना सांगावे लागले.

(Edited by Sunil Dhumal)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT