Maharashtra Legislative Assembly Sarkarnama
मुंबई

Mumbai Heavy Rain: मुंबईसह राज्यात तुफान पाऊस, अधिवेशनालाही फटका! आमदार अडकून पडले; विधानसभा अध्यक्ष मोठा निर्णय घेण्याची शक्यता

Heavy Rainfall in Mumbai: मुंबईसह राज्यभरात सुरु असलेल्या मुसळधार पावसानं राज्य विधीमंडळाच्या मुंबईत सुरु असलेल्या पावसाळी अधिवेशनालाही फटका बसला आहे.

Amit Ujagare

Mumbai Heavy Rain: मुंबईसह राज्यभरात सुरु असलेल्या मुसळधार पावसानं राज्य विधीमंडळाच्या मुंबईत सुरु असलेल्या पावसाळी अधिवेशनालाही फटका बसला आहे. शनिवार-रविवार सुट्ट्या असल्यानं आपल्या गावी गेलेले अनेक आमदार तिथं अडकून पडल्यानं याचा अधिवेशनालाही फटका बसला आहे. पुढील काही दिवस पावसाची अशीच स्थिती राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवलेला असल्यानं या आमदारांनी अधिवेशनाचं कामकाज वाढवून देण्याची मागणी केली आहे.

नेमकी स्थिती काय?

पावसाळी अधिवेशनाला शनिवार आणि रविवार अशा दोन दिवस सुट्टी असल्यानं विदर्भातील अनेक आमदार आपल्या घरी निघून गेले होते. आज सोमवारी ते मुंबईत परतणार होते, पण मुंबईत सध्या तुफान पाऊस सुरु आहे. अनेक ठिकाणी रस्ते पूरस्थितीमुळं ओसंडून वाहत आहेत. विमानतळांवरही पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. अनेक विमानांची उड्डाणं रद्द झाली आहेत. वातावरणाची दृश्यमानता देखील कमी असल्यानं विमानांच्या उड्डाणांवरही त्याचा परिणाम झाला आहे. त्यामुळं ज्या आमदारांना अधिवेशनाच्या कामकाजासाठी मुंबईत परतायचं आहे, त्या आमदारांना विमान प्रवास करताना अडचण येत आहे. त्यामुळं अनेक आमदारांनी आज मुंबईकडं न जाता उद्या विमानानं जाणार असल्याचं सांगितलं आहे.

तसंच अधिवेशनाचं कामकाजही वाढवावं अशी मागणी या आमदारांनी केली आहे. पण याबाबतचा निर्णय हा विधानसभा अध्यक्ष घेऊ शकतात. त्यामुळं ते अधिवेशनाचा कार्यकाळ वाढवण्याबाबत काय निर्णय घेतात याकडं सर्व आमदारांच्या नजरा लागून राहिल्या आहेत. पण यामुळं अधिवेशनाच्या दैनंदिन कामकाजावर याचा विपरित परिणाम होणार आहे.

वर्ध्यातील काँग्रेसचे आमदार विकास ठाकरे यांनी सांगितलं की, आज फ्लाईट उशीर झाला आहे. अजून विमान मुंबईतूनच न उडल्यानं नागपुरात केव्हा येणार आणि केव्हा पुन्हा मुंबईकडं उड्डाण घेणार? हे सगळं पाहता आज जाण्याचा उद्यावर ढकलले आहे. त्यामुळं कामकाज वाढवून द्यावे अशी मागणी आहे, मात्र, हा निर्णय विधानसभा अध्यक्ष घेतील असं विकास ठाकरे यांनी साम टिव्हीशी बोलताना सांगितलं आहे.

तसंच भाजप आमदार प्रवीण दटके यांनी सांगितलं की, मुंबईतील पावसामुळं मुंबईत जाण्याच कॅन्सल केलं आहे. अनेक आमदारांनी विमानतळावरूनच दौरा रद्द केला आहे. पावसामुळं मुंबईवरून विमान नागपुरात यायला उशीर होत आहे. असंच पावसामुळं एकदा 11 तास विमानात राहावं लागलं होतं, याचा मोठा फटका बसला होता. त्यामुळं अडकण्यापेक्षा मी उद्या जाण्याचा निर्णय घेतला आहे.

दरम्यान, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आमदार विकास ठाकरे, प्रवीण दटके यांच्यासह अनेक आमदारांनी मुंबईला उद्या जाण्याच ठरवलं आहे. पण आता उद्याही पावसाची अशीच स्थिती कायम राहिली तर उद्याच्या अधिवेशनाच्या कामकाजावरही विपरित परिणाम होण्याची शक्यता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT