Eknath Shinde Shivsena  Sarkarnama
मुंबई

Shivsena Shinde Group: कोर्टात जाऊनही '50 खोके' शिंदे गटाचा पिच्छा सोडेना; विधानसभेलाही घाम फोडणार

High court rejected on "50 khoke akdam ok" slogan petition: शरद माळी यांच्यासह ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी मंत्री सत्तार यांच्या वाहनाच्या ताफ्यावर कापूस व रिकामे खोके फेकले होते. यावेळी ‘50 खोके एकदम ओके’ अशा घोषणा देण्यात आल्या.

Mangesh Mahale

Mumbai News: शिवसेनेत एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडानंतर '50 खोके एकदम ओके' ही घोषणा (50 Khoke Ekdam Ok) महाराष्ट्रात राजकारण चर्चेची ठरली. महाराष्ट्रात झालेल्या सत्तातरानंतर विरोधकांनी सत्ताधारी एकनाथ शिंदेंवर हल्लाबोल करण्यासाठी या घोषणेचा शस्त्र म्हणून वापर केला. आजही अनेक वेळी शिंदे गटातील आमदार दिसताच विरोधक त्यांना '50 खोके एकदम ओके' म्हणून हिणवतात.

शिंदे-फडणवीस सरकार स्थापन होऊन अडीच वर्ष झाली पण शिंदे-फडणवीसांना 50 खोक्यांचा आरोप अद्यापही पुसता आलेला नाही. त्यामुळे '50 खोके...' ही घोषणा शिंदे-फडणवीसांची डोकेदुखी ठरली आहे. लोकसभेनंतर हे '50 खोके...' आता विधानसभा प्रचारातही शिंदे गटातील नेत्यांचा घाम फोडणार असल्याचे दिसते.

या घोषणेबाबत मुंबई उच्च न्यायालयाने निकाल देत स्पष्टीकरण दिले आहे. या घोषणेच्या विरोधात दाखल करण्यात आलेली एफआयआर उच्च न्यायालयाने रद्द केली आहे. धरणगाव (जि. जळगाव) येथील पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला होता.

गेल्या वर्षी मार्च महिन्यात शिंदे गटाचे (Shinde Group) आमदार अब्दुल सत्तार हे जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असता त्यावेळी अँड. शरद माळी यांच्यासह ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी मंत्री सत्तार यांच्या वाहनाच्या ताफ्यावर कापूस व रिकामे खोके फेकले होते. यावेळी ‘50 खोके एकदम ओके’ अशा घोषणा देण्यात आल्या. याप्रकरणी माळी यांच्यासह ठाकरे गटातील शिवसैनिकांविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला होता.

हा गुन्हा रद्द करण्यासाठी शरद माळी यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती, यावर न्यायालयाने निर्वाळा दिला. "५० खोके एकदम ओके" ही घोषणा म्हणजे गुन्हा नाही, असे न्यायालयाने म्हटलं आहे. सरकारने अपेक्षा भंग केल्यास उद्रेक तर होणारच, असे न्यायालयाने निकाल देताना म्हटलं आहे.

सामाजिक शांतता कायम ठेवण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय केल्याचा दावा, पोलिसांनी केला होता. त्यावर मात्र प्रत्येक आंदोलन हे सामाजिक शांततेचा भंग करण्यासाठी केलेले नसते, असे खडेबोल खंडपीठाने पोलिसांना सुनावले.

लोकसभा निवडणुकीच्या वेळी ठाकरे गटाने शिंदे गटाला डिवचण्याची एकही संधी सोडली नाही. आता विधानसभेला '50 खोके एकदम ओके'ही घोषणा पुन्हा प्रचारात ऐकू येण्याची शक्यता नाकारता येत नाही.

नेमकं काय घडलं...

जिल्ह्यात गेल्या वर्षी मार्च महिन्यात कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांचा शासकीय दौरा झाला होता. कापसाला दहा ते बारा हजार रुपये भाव मिळावा, अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे होऊन शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई मिळावी अशा मागणीचे निवेदन देण्यासाठी शिवसेना (ठाकरे) गटाच्या पदाधिकाऱ्यांनी अब्दुल सत्तार यांच्या ताफ्यावर कापूस आणि रिकामे खोके फेकत, पन्नास खोके एकदम ओके अशी जोरदार घोषणाबाजी करून ताफा अडवण्याचा प्रयत्न केला होता.

हा गुन्हा रद्द व्हावा अशी मागणी करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात दाखल केली होती. कृषी मंत्री अब्दुल सत्तार आणि पालक मंत्री गुलाबराव पाटील यांना ‘पन्नास खोके एकदम ओके’ ही घोषणा जिव्हारी लागल्यामुळेच राजकीय सुडापोटी हा गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचा युक्तिवाद याचिकाकर्त्याच्या वतीने करण्यात आला.

औरंगाबाद खंडपीठाचा आदेश

न्यायमूर्ती विभा कंकणवाडी आणि न्यायमूर्ती संतोष चपळगावकर यांच्या न्यायपीठासमोर याचिकेची सुनावणी झाली. खंडपीठाने आंदोलन करणे हा प्रत्येक नागरिकाचा अधिकार असून जेव्हा जेव्हा सरकारकडून अपेक्षा असतात तेव्हा तेव्हा नागरिकांकडून प्रतिक्रिया ह्या उमटतातच,आंदोलन काळात सार्वजनिक शांतता प्रस्थापित करण्यासाठी जिल्हाधिकारी यांनी जमावबंदी आदेश जरी लागू केले असले, तरी प्रत्येक आंदोलन हे सार्वजनिक शांतता भंग करेलच असेही नाही; अशी महत्त्वाची टिप्पणी करत दंगलीचा गुन्हा रद्द केल्याचा आदेश दिला. याचिकाकर्त्याच्या वतीने ॲड. भुषण महाजन यांनी कामकाज पाहिले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT