MNS Sandeep Deshpande Latest News Updates, MNS Latest news Sarkarnama
मुंबई

संदिप देशपांडेच्या अडचणीत वाढ; पोलिसांसमोर पळून जाणे महागात पडणार!

Sandip Deshpande | MNS : संदिप देशपांडे ताब्यात घेण्यासाठी आलेल्या पोलिसांसमोरन पळून गेल्याचे दृश्य कॅमेरात कैद

सरकारनामा ब्युरो

मुंबई : पोलिसांच्या हातावर तुरी देवून पळून जाणा मनसे (MNS) नेते संदिप देशपांडे यांना महागात पडण्याचे चिन्ह आहेत. आज सकाळी शिवतीर्थ बाहेर पोलिस देशपांडे यांना ताब्यात घेण्यासाठी आले होते. पण या दरम्यान देशपांडे पोलिसांसमोरच गाडीत बसून पळून गेले. यावेळी झालेल्या झटापतीत एक महिला पोलिस कर्मचारी जखमी झाल्या आहेत. त्यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

दरम्यान या प्रकरणाची दखल राज्याच्या गृहमंत्रालयाने घेतली असून देशपांडे यांच्यावर तात्काळ कारवाई करण्याचे निर्देश गृहराज्यमंत्री शंभुराजे देसाई यांनी दिले आहेत. ते म्हणाले, मनसेचे नेते संदिप देशपांडे यांनी आज मुंबई पोलीस दलातील महिला अधिकारी यांचेशी केलेल्या गैरवर्तनाची माहिती मी घेतली असून सदरच्या घडलेल्या गंभीर प्रकाराबद्दल तात्काळ कारवाई करण्याचे निर्देश मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे यांना दिले आहेत. देशपांडे यांच्यावर सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल होऊ शकतो, असे सांगितले जात आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या इशाऱ्यानंतर राज्यभरातील मनसे कार्यकर्ते आक्रमक झाले आहे. राज्यात अनेक ठिकाणी सकाळी मशिदींमध्ये भोंग्यांविना नमाज झाले. आता एक वाजताचे नमाज पठण असून त्याआधी पोलिसांकडून मनसे कार्यकर्त्यांची धरपकड सुरू आहे. मनसे नेते संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) यांनाही पोलीस ताब्यात घेणार होते. पण राज ठाकरे यांच्या निवासस्थान असलेल्या शिवतीर्ताबाहेरून देशपांडे हे पोलिसांच्या ताब्यातून निसटले. (MNS Sandeep Deshpande Latest News Updates)

यावेळी एक महिला कर्मचारी जखमी झाल्या आहेत. संदीप देशपांडे हे सकाळी शिवतीर्थावर आले होते. याठिकाणी मनसे कार्यकर्त्यांची मोठी गर्दी झाली होती. त्यामुळे पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला असून येणाऱ्या कार्यकर्त्यांना तिथून जाण्यास सांगितले जात आहे. देशपांडेही तिथे आले होते. पोलीस त्यांना ताब्यात घेण्याच्या प्रयत्नात होते. यावेळी माध्यमांशी बोलल्यानंतर पोलीस त्यांना घेऊन वाहनात बसवण्यासाठी नेत होते.

देशपांडेंभोवती पोलिसांसह माध्यमांच्या प्रतिनिधींचाही गराडा होता. पण तेवढ्यात देशपांडेंच्या वाहनचालकाने त्यांची गाडी पोलिसांच्या वाहनाजवळ आणून उभी केली. पोलिसांची नजर चुकवून देशपांडे आपल्या गाडीत बसले आणि चालकाने थेट गाडी पुढे नेली. हे लक्षात येता पोलीस गाडीच्या मागे धावले पण तोपर्यंत गाडी निघून गेली होती. आता पोलीस देशपांडे यांचा शोध घेत आहेत.

मशिदींवरील भोंगे उतरवण्यासाठी ३ मे चा अल्टिमेटम दिला होता. त्यानंतर आता आजपासून राज्यभरातील मशिदींसमोर मोठ्या आवाजात हनुमान चालिसा लावणार असल्याचेही सांगण्यात आले आहे. त्या पार्श्वभूमीवर दोन समाजात तेढ निर्माण होवू नये म्हणून सर्व मशिदींबाहेर आणि त्यातही विशेषतः संवेदनशील ठिकाणी कडेकोट पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तर काही मशिदींबाहेर भोंग्याविनाच अजान पार पडली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT