Uddhav Tahckeray Sarkarnama
मुंबई

Uddhav Thackeray Group : आता चर्चा तर होणारच! ठाकरे गटाच्या कार्यक्रमाची परवानगी रद्द, कारण काय?

शर्मिला वाळुंज

Mumbai Political News : कल्याण-डोंबिवलीतील चौकाचौकांत शिवसेना ‘उद्धव बाळासाहेब ठाकरे’ पक्षातर्फे ‘होऊ दे चर्चा’ कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. डोंबिवलीमध्ये सहा दिवसांपासून सुरू असलेल्या कार्यक्रमाची पोलिसांनी अचानक परवानगी रद्द केली. उल्हासनगर येथील कार्यक्रमाचे कारण देत पुढील कार्यक्रमांच्या परवानग्या रद्द केल्याचे पोलिसांनी नोटीसमध्ये म्हटले आहे. यावर ठाकरे गटाने नाराजी व्यक्त केली. ही लोकशाही असून, असे किती दिवस लोकांची तोंडं बंद करणार. आम्ही लढा देऊ, असे म्हणत हा कार्यक्रम करूच, असा निर्धार डोंबिवली शहर प्रमुख विवेक खामकर यांनी व्यक्त केला आहे. (Latest Political News)

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातर्फे ‘होऊ दे चर्चा’ कार्यक्रमांचे आयोजन ठिकठिकाणी करण्यात आले आहे. यात केंद्र, राज्य सरकारने केलेल्या फसव्या योजनांविषयी या चौक सभांच्या माध्यमातून स्थानिक शिवसेना (Shivsena) पदाधिकारी नागरिकांशी संवाद साधत आहेत. कल्याण-डोंबिवलीमध्ये १ ते २१ ऑक्टोबरदरम्यान या कार्यक्रमाचे नियोजन आहे. यासाठी शहरप्रमुख सचिन बासरे, डोंबिवलीत शहरप्रमुख विवेक खामकर यांनी पुढाकार घेतला आहे. त्यासाठी रितसर परवानगीही काढण्यात आली होती.

डोंबिवली पश्चिमेला आयोजित सभांना नागरिकांचा प्रतिसाद मिळाला होता. यानंतर शनिवारपासून हा कार्यक्रम डोंबिवली पूर्वेतील जनरल अरुणकुमार वैद्य चौक, गांधीनगर, डोंबिवली पूर्व व हनुमान मंदिर, पी. अॅण्ड टी. कॉलनी या परिसरात होणार होता. आता डोंबिवलीतील तीनही पोलिस ठाण्यांतून विवेक खामकरांना नोटीस बजावण्यात आली आहे. त्यातून संबंधित कार्यक्रमांची परवानगी रद्द करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.

नोटीसमध्ये काय म्हटले?

पोलिसांच्या नोटीसमध्ये उल्हासनगर येथे शिवसेना उद्धव बाळसाहेब ठाकरे पक्षातर्फे 'होऊ दे चर्चा चौक सभा' हा कार्यक्रम आयोजित केला आहे. त्यातील वक्त्यांनी पंतप्रधान यांच्याविरुद्ध अपशब्द वापरल्याने त्या ठिकाणी सार्वजनिक शांतता बिघडून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता. त्यानुसार डोंबिवलीमध्ये हा कार्यक्रम घेतल्यास कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. यासाठी या कार्यक्रमाची परवानगी नाकारण्यात येत आहे.

सध्या ठाणे शहर पोलिस आयुक्तालय, तसेच पोलिस आयुक्तालय परिसरात मनाई आदेश लागू करण्यात आलेला आहे. त्यानुसार विनापरवाना कोणताही कार्यक्रम किंवा पाचहून अधिक लोकांनी एकत्रित येऊन शांतता बिघडवण्याचे कृत्य करण्यास मनाई आहे. या नियमांचे उल्लंघन झाल्यास सर्वस्वी आपणास जबाबदार धरण्यात येईल, असे सांगण्यात आले आहे. (Maharashtra Political News)

याविषयी शहर प्रमुख खामकर म्हणाले, हा कार्यक्रम तात्पुरत्या स्वरूपात रद्द करण्यात आला आहे. डोंबिवलीमधील तीन पोलिस ठाण्यांतून कार्यक्रमाची परवानगी नाकारण्यात येत असल्याची नोटीस बजावण्यात आली आहे. या प्रकरणी आमच्या वरिष्ठांशी बोलून न्यायालयात धाव घेणार आहे. सध्या लोकशाही आहे आणि जे चुकीचे आहे ते चुकीचे आम्हाला बोलायचेच आहे. असे किती दिवस तुम्ही सगळ्यांची तोंडं बंद करत राहणार, असाही प्रश्न खामकारांनी उपस्थित केला आहे.

(Edited by Sunil Dhumal)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT