poonam mahajan, Pramod Mahajan sarkarnama
मुंबई

Poonam Mahajan : माझ्या वडिलांना मारणाऱ्या मास्टरमाईंडचा शोध काँग्रेस-राष्ट्रवादीने का घेतला नाही ?

Poonam Mahajan : "तुमचं सरकार असताना माझे वडील गेले ? तेव्हा तुम्ही ते मास्टर माईंड शोधून दाखवला नाही,"

सरकारनामा ब्युरो

Poonam Mahajan : महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने मुंबईत प्रचार मोहीम सुरू केली आहे. ‘जागर मुंबईचा’ हे अभियान रविवारपासून (ता.६) भाजपकडून सुरू करण्यात आले आहे. मुंबईतील प्रत्येक विधानसभा मतदारसंघात एक याप्रमाणे मुंबईत ३६ सभा घेण्याचे नियोजन या अभियानात करण्यात आले आहे.

भाजपच्या जागर मुंबईचा अभियानाअंतर्गत वांद्रे येथील बीकेसी मैदानावर काल (रविवारी) भाजपने जाहीर सभा घेतली. या सभेत भाजपच्या खासदार पूनम महाजन यांनी त्यांचे वडिल कै. प्रमोद महाजन यांच्याबाबत भाष्य केले. प्रमोद महाजन यांच्या मृत्यूच्या तब्बल 16 वर्षानंतर पूनम महाजन केलेल्या आरोपामुळे खळबळ उडाली आहे.

"माझ्या वडिलांना कुणी मारले मला माहिती आहे, पण त्या मागे मास्टरमाइंड कोण होते?," असा सवाल पूनम महाजन यांनी केला आहे. तेव्हा तुम्ही सत्तेत होतात असे म्हणत काँग्रेस-राष्ट्रवादीवर निशाणा साधला आहे. "तुमचं सरकार असताना माझे वडील गेले ? तेव्हा तुम्ही ते मास्टर माईंड शोधून दाखवला नाही," असा गंभीर आरोप महाजन यांनी केला.

भाजपला महापौरपद का दिले नाही?

"उद्धव ठाकरेंनी मुंबईकर आणि मराठी माणसाचे नाव घेऊन राजकारण केले. राज्यात आता मराठी- गुजराती असा वाद निर्माण करताय? तुम्ही हे कदाचित विसरले असाल की गुजरात भाजपचे अध्यक्षदेखील मराठी आहे. गुजरातमध्ये मराठी माणसाने जो झेंडा फडकवला त्याचा अभिमान उद्धव ठाकरेंना नाही का ? जर 50 -50 चा फॉर्म्युला ठरला होता तर मुंबई महापालिकेत उद्धव ठाकरेंनी भाजपला महापौरपद का दिले नाही," असा सवालही महाजन यांनी उपस्थित केला आहे.

हे घडवणारे शंकुनी कोण ?

"युतीमध्ये भांडण झाले, दोन भावांमध्ये महाभारत झाले हे घडवणारे शंकुनी कोण होते, हे सर्वांना माहिती आहे. शंकुनींनी सर्व घडवले आणि स्वत: सत्तेत जाऊन बसले. मी काही बोलले तर माझ्या वडिलांना कुणी मारले असा प्रश्न हे सगळे विचारतील असे पूनम महाजन म्हणाल्या. पण माझ्या बापाला कुणी मारले हे मला माहिती आहे, तो प्रश्न निर्माण करुन काही होणार नाही, पण त्या मागे मास्टरमाइंड कोण होते? हे तुम्ही शोधून दाखवले नाही, असे म्हणत काँग्रेस राष्ट्रवादीवर टीका केली आहे.

3 मे 2006 रोजी वरळी येथील 'पूर्णा' निवासस्थानी प्रमोद महाजन यांची हत्या झाली. प्रमोद महाजन यांचे भाऊ प्रविण महाजन यांनीच घरात घुसून त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. यानंतर प्रविण महाजन यांना अटक झाली. या घटनेमुळे महाराष्ट्रात खळबळ उडाली होती.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT