मुंबई

मी माझ्या पक्षाचा झेंडा बदलला नाही : उद्धव ठाकरे

सरकारनामा ब्युरो

मुंबई : कट्टर हिंदुत्ववादी पक्ष म्हणून मान्यता मिळविण्यासाठी राज ठाकरे यांनी काढलेल्या मोर्चाची धडपड पाहून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी ‘मी माझ्या पक्षाचा झेंडा बदलला नाही, एक माणूस एक झेंडा हे आमचं ठरलेलं आहे. जगाला ठाऊक आहे आपलं हिंदुत्व काय आहे,’ असा टोला मनसेला हाणला. 

‘मला माझं हिंदुत्व सिद्ध करण्याची गरज नाही, कारण ते बाळासाहेबांचं शुद्ध हिंदुत्व आहे,’ असे सांगत शिवसेना कट्टर हिंदुत्ववादी पक्ष असल्याचे ठणकावून सांगितले. 

या वेळी सीएए, एपीआर आणि एनआरसीविषयीची भूमिका उद्धव ठाकरे यांनी आमदारांना स्पष्ट केली. या कायद्यातील तरतुदी काय आहेत हे समजून घेण्याचे आवाहनही त्यांनी आमदारांना केले. 

महाराष्ट्र विकास आघाडी सरकारने जनतेच्या हितासाठी आरोग्यसेवा, शिवभोजन, कर्जमुक्तीसह अनेक योजना जाहीर केल्या आहेत. या योजना तळागाळापर्यंत पोहोचायला हव्यात, तेव्हा जनतेमध्ये जाऊन त्यांच्याशी संवाद साधा, अशा सूचना शिवसेना पक्षप्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज शिवसेनेच्या जिल्हाप्रमुख, आमदारांना दिल्या. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज सह्याद्री अतिथिगृह येथे शिवसेनेच्या जिल्हाप्रमुख, आमदारांशी संवाद साधला. 

जनतेला प्रश्न घेऊन मुंबईपर्यंत येण्याची वेळ येऊ देऊ नका, असेही ठाकरे यांनी सांगितले.

ग्रामीण भागातील जनतेचे प्रश्न त्या त्या जिल्ह्यात, विभागात सुटावेत यासाठी मुख्यमंत्री कार्यालये सुरू करण्यात आली आहेत. यासाठीची समन्वयाची जबाबदारी आमदार रवींद्र वायकर यांच्याकडे देण्यात आली आहे.

सामान्य जनतेचे प्रश्न या कार्यालयांच्या माध्यमातूनच सुटायला हवेत. त्यांना हे प्रश्न घेऊन मुंबईपर्यंतचा हेलपाटा घालण्याची वेळ येता कामा नये, याची काळजी आमदार आणि प्रशासनाने घ्यायची आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT