Chandrakant Patil, Amol Kolhe Sarkarnama
मुंबई

MP Amol Kolhe : "अमोल कोल्हे भाजप वा शिंदे गटात आले तर आढळरावांची समजूत घालावी लागेल"

Chandrakant Patil Statement : चंद्रकांत पाटलांच्या विधानानंतर अमोल कोल्हेंच्या भाजपप्रवेशाबाबत पुन्हा चर्चा

सरकारनामा ब्युरो

प्राची कुलकर्णी

Maharashtra Politics : गेल्या काही महिन्यांपासून राष्ट्रवादी काँग्रेस नेते, शिरुरचे खासदार अमोल कोल्हे हे भाजपमध्ये जाणार अशा चर्चांना उधाण आले आहे. स्थानिक पदाधिकाऱ्यांनी खासदार राष्ट्रवादी पक्षाच्या कार्यकर्त्यांना भेटत नाहीत. पक्षाच्या कार्यक्रमांना येत नाहीत, असा आरोप केले आहेत. दरम्यान, चिंचवड आणि कसबा पोटनिवडणुकीत स्टार प्रचारकांत नाव असूनही कोल्हे यांनी एकाही सभेत हजेरी लावली नाही. त्यामुळे पुन्हा त्यांच्या भूमिकेविषयी शंका निर्माण झाली होती. चर्चा असतानाही भाजपच्या एकाही पदाधिकाऱ्यांकडून कोल्हे यांच्याबाबत प्रतिक्रिया दिलेली नव्हती.

आता मात्र खासदार कोल्हे यांच्या भाजप प्रवेशाबाबत पालकमंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी सूचक वक्तव्य केले आहे. पाटील यांनी 'साम टीव्ही'ला दिलेल्या विशेष मुलाखतीत खासदार कोल्हे यांच्याबाबत हे वक्तव्य केले आहे. त्यामुळे कोल्हे यांच्या भाजप प्रवेशाची पुन्हा चर्चा सुरू झाली आहे.

जागावाटपाबाबत पाटील म्हणाले, "भाजपसोबत आलेल्या शिंदे गटाला पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या निर्णयांचा फायदा होणारच आहे. आता मात्र महाराष्ट्रातील परिस्थिती कधी नव्हे इतकी अस्थिर झाली आहे. ही स्थिती सतत बदलत आहे. त्यामुळे जागावाटपबाबत आत्ताच काही निर्णय घेता येणार नाही."

जागावाटपाच्या चर्चेत त्यांनी शिरुरच्या (Shirur) जागेबद्दलही मत व्यक्त केले. यावेळी त्यांनी खासदार कोल्हे यांच्या भाजप (BJP) प्रवेशाबाबत सूचक वक्तव्य केले. पाटील म्हणाले, "लोकसभा निवडणूक प्रक्रिया डिसेंबर-जानेवारी महिन्यात सुरू होईल. त्यानंतर राज्यातील विधानसभा निवडणूक होईल. राज्यातील राजकीय स्थिती पाहता शिरुर लोकसभेच्या जागेबाबतआत्ताच कसे ठरवणार? समजा उदाहरण म्हणून कोल्हेंना वाटले की आपण भाजपमध्ये जावे, तर त्यांनी शिंदे गट का भाजपकडून निवडणूक लढवायची ते ठरवावे लागेल."

यानंतर पाटील यांनी माजी खासदार आढळराव पाटील यांच्या उमेदवारीबाबत मोठे विधान केले. पाटील म्हणाले, "अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांना वाटू शकत की आपण भाजपमध्ये जावे, अशा वेळी आढळराव (Shivajirao AdhalRao Patil) यांची समजूत घालावी लागेल." पाटील यांच्या या भूमिकेमुळे भाजप निवडणुकीत पुन्हा आयाराम व्यक्तींना प्राधान्य देईल, हे स्पष्ट केले आहे.

दरम्यान, पक्ष बदलाबाबत खासदार कोल्हे यांनीच संदिग्धता निर्माण केलेली आहे. ते म्हणाले होते की, "मी शेतकऱ्याचा पोरगा आहे. एक गोष्ट पक्की ठाऊक आहे की शेतकरी उगाच औत खांद्यावर घेऊन हिंडत नाही. वारा आणि आभाळ बघून गणित बांधायचे असते आणि मग वावर नांगरायला घ्यायचे असते." यानंतर आता भाजप नेते चंद्रकांत पाटील यांच्या विधानामुळे कोल्हे यांच्या भाजप प्रवेशाबाबत पुन्हा चर्चा सुरू झाली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT