Naseem Khan
Naseem Khan Sarkarnama
मुंबई

`राहुल गांधींचे ऐकले असते तर ७०० शेतकऱ्यांचा बळी गेला नसता`

सरकारनामा ब्यूरो

मुंबई : शेतकऱ्यांना देशोधडीला लावणारे तीन काळे कृषी कायदे (Farm Laws) केंद्र सरकारला (Central Government) मागे घ्यावे लागले हा शेतकऱ्यांच्या त्यागाचा, बलिदानाचा, त्यांनी वर्षभर केलेल्या संघर्षाचा विजय आहे. पंतप्रधानांनी कायदे मागे घेत असल्याचे जाहीर करुनही जोपर्यंत संसदेत निर्णय होत नाही तोपर्यंत शेतकरी त्यावर विश्वास ठेवण्यास तयार नाही. हा पंतप्रधानांनी शेतकरी व जनतेचा विश्वास गमावल्याचे द्योतक आहे, असे माजी मंत्री व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस (Congress) कमिटीचे कार्याध्यक्ष आरिफ नसीम खान (Naseem Khan) यांनी म्हटले आहे.

केंद्र सरकारने तीन काळे कृषी कायदे मागे घेतल्यानंतर प्रदेश काँग्रेसने आज (ता.20 नोव्हेंबर) राज्यभर 'किसान विजय दिवस' साजरा केला. मुंबईत टिळक भवन येथे फटाके वाजवून व मिठाई वाटून आनंदोत्सव साजरा केला. यावेळी प्रदेश कार्याध्यक्ष नसीम खान, चंद्रकांत हंडोरे, माजी खासदार डॉ. भालचंद्र मुणगेकर, मुनाफ हकीम, प्रदेश सरचिटणीस राजन भोसले, राजेश शर्मा, प्रमोद मोरे, रमेश शेट्टी, सचिव राजाराम देशमुख आदी पदाधिकारी उपस्थित होते.

नसीम खान म्हणाले, या आंदोलनात काँग्रेस पक्ष पहिल्या दिवसापासून शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिला. खासदार राहुलजी गांधी यांनी रस्त्यावर उतरुनही या संघर्षात सहभाग घेतला. पहिल्या दिवसापासून राहुल गांधी यांनी, हे कायदे सरकारला मागे घ्यावे लागतील, अशी परखड भूमिका मांडली होती. अखेर मोदी सरकारला हे जुलमी कायदे मागे घ्यावेच लागले आहे. गांधी यांचे आधीच ऐकले असते तर ७०० शेतकऱ्यांचा नाहक बळी गेला नसता व आर्थिक नुकसानही झाले नसते. महाराष्ट्रातही शेतकरी आंदोलनात काँग्रेस पक्षाने भक्कम साथ दिली. हे काळे कायदे रद्द करावेत यासाठी शेतकरी मेळावे, ट्रॅक्टर रॅली काढण्यात आली. राज्यातून ६० लाख सह्यांचे निवेदन राष्ट्रपतींकडे पाठवण्यात आले.

शेतकऱ्यांच्या आंदोलनाला नक्षलवादी, देशद्रोही, खलिस्तानी, आंदोलनजीवी म्हणून अपमानित करण्यात आले. त्यांच्यावर अत्याचार केले गेले, दिल्लीत येऊ नये म्हणून रस्त्यावर मोठे खिळे ठोकले, भिंती उभ्या केल्या पण शेवटी शेतकरी एकजुटीपुढे केंद्र सरकारला झुकावे लागले. शेतकऱ्यांचा केलेला अपमान जनता कधीही विसरणार नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेला प्रत्येक निर्णय देशाला खड्यात घालणारा निघाला. नोटबंदी, कोरोना व काळे कृषी कायदे हे घातक ठरतील हे राहुल गांधींनी जाहीरपणे सांगितले होते. मात्र, त्याकडे लक्ष देण्याऐवजी त्यांची खिल्ली उडवण्यात आली. भाजपाचा हा अहंकार, मनमानीपणा हा देशातील जनतेच्या मुळावर उठला असून त्यात नुकसान जनतेचे होत आहे, असे खान म्हणाले.

पुणे येथे प्रदेश उपाध्यक्ष मोहन जोशी, रमेश बागवे, उल्हास पवार यांनी सहभाग घेतला. नाशिक, सोलापूर, नागपूर, अमरावती, पनवेल, परभणी, लातूर, नांदेडसह राज्यातील सर्व जिल्हा, तालुक्यातही काँग्रेस पदाधिकारी यांनी जल्लोष करून किसान विजय दिवस साजरा केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT