Water Taxi Service
Water Taxi Service Sarkarnama
मुंबई

...तर माझ्यावर अन्याय झाला असता : आमदार मंदा म्हात्रेंचे सूचक वक्तव्य

सरकारनामा ब्यूरो

नवी मुंबई : बेलापूर जेट्टी आणि वॉटर टॅक्सी सेवेचे उद्‌घाटन गुरुवारी (ता. १७ फेब्रुवारी) झाले. या कार्यक्रमात बोलताना बेलापूरच्या भाजप आमदार मंदा म्हात्रे (manda mahatre) यांनी ‘आपण उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या खांद्याला खांदा लावत सलग १७ वर्षे काम केले आहे,’ असे सांगितले. तसेच, मला या कार्यक्रमात बोलायला दिले नसते, तर माझ्यावर अन्याय झाला असता,’ असे सूचक वक्तव्य केले. (Inauguration of Water Taxi Service in Navi Mumbai)

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, केंद्रीय जलवाहतूक मंत्री सर्बानंद सोनोवाल, उपमुख्यमंत्री अजित पवार, पालकमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री अस्लम शेख, अब्दुल सत्तार, खासदार राजन विचारे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम झाला. त्या कार्यक्रमात आमदार म्हात्रे बोलत होत्या.

मंदा म्हात्रे म्हणाल्या की, ‘मला बोलायला वेळ कमी दिला आहे, त्यामुळे मी माझे बोलणे थोडक्यात मांडणार आहे. राष्ट्रवादीने मला २००४ मध्ये विधान परिषदेचे आमदार केले, तेव्हापासून मी जेटी आणली, ही आठवी जेट्टी आहे. नवव्या जेट्टीचे दिवाळीत उद्‌घाटन होणार आहे. मी सलग सतरा वर्षे अजितदादांच्या खांद्याला खांदा लावून त्यांच्याबरोबर काम केलेले आहे. आपली प्रवासी जेट्टीची मागणी होती, ती आज पूर्ण झाली असून त्याचे उद्‌घाटन होते आहे. आज आपण एवढे लोक येथे आला आहात आणि मला बोलायला दिले नसते, तर साहेब माझ्यावर अन्याय झाला असता. मी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानते. त्यांनी मला महिला आमदार म्हणून बोलायची संधी दिली आहे.’’

दरम्यान, याच मुद्यावर आमदार म्हात्रे यांनी काही महिन्यांपूर्वी आपल्याच पक्षावर निशाणा साधला होता. मला कार्यक्रमाला बोलावले जात नाही. मला पक्षाच्या कार्यक्रमातून डावलले जाते, असे म्हणत त्यांनी भाजपवर हल्लाबोल केला होता. बेलापुरात महाराष्ट्र भवन उभारण्याची मागणीही त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली. महाराष्ट्र भवनासाठी सिडको आपल्याला जागा देणार असल्याचेही म्हात्रे यांनी यावेळी सांगितले.

उदघाटनादिवशीच नाराजी

बेलापूर जेट्टीचे उदघाटन करत वॉटर टॅक्सीला आज हिरवा झेंडा दाखविण्यात आला. हा जल प्रवास सुखकर व पर्यावरण पूरक असला तरी बेलापूर ते भाऊचा धक्का हा प्रवास स्पीड बोटने करण्यासाठी प्रति प्रवासी तब्बल ८०० ते १२०० रुपये भाडे आकारण्यात येणार असल्याने उदघाटनादिवशीच नाराजी व्यक्त करण्यात येते आहे. नवी मुंबईत मोठ्या प्रमाणात मध्यमवर्गीय राहत असल्याने त्यांना परवडेल अशा दरात ही जलवाहतूक उपलब्ध करून द्यावी अशी मागणी स्थानिक भाजप आमदार मंदा म्हात्रे यांनी केली. तर प्रवाशांच्या खिशाला या प्रवास भाड्याचे दर परवडणारे नसून याच्या अर्ध्या भाड्यामध्ये हा प्रवास उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी नागरिक करीत आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT