Yashwant Jadhav News updates  Sarkarnama
मुंबई

निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेची अडचण; यशवंत जाधव यांच्या घरी आयकरचा छापा

Yashwant Jadhav | Income Tax | Raid | जानेवारी महिन्यात किरीट सोमय्यांनी केली होती तक्रार

सरकारनामा ब्युरो

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसनंतर आता शिवसेना केंद्रीय तपास यंत्रणांच्या रडारवर आली आहे. मंत्री नवाब मलिक यांच्या नंतर दोनच दिवसात शिवसेना उपनेते आणि मुंबई महानगरपालिकेचे स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव(Yashwant Jadhav) यांच्या आज सकाळी आयकर विभागाने छापा टाकला आहे. सोबत CISF ची टीम देखील उपस्थित आहे. शेल कंपन्यांमधील गुंतवणूक, कोविड काळातील भ्रष्टाचाराचे आरोप, जवळपास १५ कोटी रुपयांचा गैरव्यवहार आणि हे पैसे युएईकडे वळते केल्याबाबत आयकरकडून जाधव यांची चौकशी करण्यात येत आहे.

दरम्यान, जानेवारी महिन्यात भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या(Kirit Somaiya) यांनी यशवंत जाधव यांनी कोट्यवधी रुपयांची मनी लॉन्ड्रिंग केल्याचा आरोप केला होता. सोबतच आयकर विभागाच्या हाती पुरावे देखील दिले होते. जाधव यांचे पितळ उघडं पाडण्यासाठी आयकर विभागाकडे पाठपुरावा करणार असून त्यांना मदत करणार असल्याचेही सोमय्या म्हणाले होते. ऐन महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर जाधव यांच्या घरी छापेमारी झाल्याने शिवसेनेच्या अडचणीत वाढ झाली आहे.

कोण आहेत यशवंत जाधव?

यशवंत जाधव हे १९९७ साली बृहन्मुंबई महानगरपालिकेत नगरसेवक म्हणून निवडून आले. पुढे २००७ साली ते पुन्हा नगरसेवक म्हणून निवडून आले. २००८ साली बाजार आणि उद्यान समितीच्या अध्यक्षपदी त्यांच्यी निवड झाली. २०११ नंतर ते शिवसेनेचे उपनेते बनले. तर २०१७ मध्ये महानगरपालिकेत सभागृह नेते म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली. एप्रिल २०१८ मध्ये महानगरपालिकेच्या स्थायी समिती अध्यक्षपदी त्यांची निवड झाली. याशिवाय त्यांच्या पत्नी यामिनी जाधव या भायखळा मतदार संघातून आमदार आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT