Mahamandal Expansion News Sarkarnama
मुंबई

Mahamandal Expansion: महामंडळ वाटपाचा फॉर्म्युला ठरला?; अजितदादांच्या एन्ट्रीने शिंदे गटाला बसणार फटका

सरकारनामा ब्यूरो

Mumbai News : शिंदे-फडणवीस सरकारमध्ये राष्ट्रवादी (अजित पवार गट) सामील झाल्यांनतर आता महामंडळे आणि विविध शासकीय समित्यांवरील नियुक्तीचा फॉर्म्युला ठरला असल्याचे बोलले जात आहे. आधी भाजप आणि शिंदे गट यांच्यात ६०-४० असा फॉर्म्युला ठरला होता.

मात्र, अजित पवारांचा गट सत्तेत समील झाल्यानंतर हा फॉर्म्युला बदलला असून मंत्रिमंडळ विस्तारानंतर आता महामंडळाच्या वाटपासाठी ५०-२५-२५ चा फॉर्म्युला ठरल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून देण्यात आली आहे. अजितदादांचा सरकारमध्ये सहभागी होण्याचा सर्वाधिक फटका शिवसेना शिंदे गटाला बसला असून त्यामुळे शिंदे गट नाराज असल्याचे बोलले जाते.

आगामी काळात आणखी काही महामंडळाची स्थापना करण्याचा राज्य सरकारचा मानस असून त्यामुळे तीनही पक्षांच्या नेत्यांना महामंडळांवर संधी मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. विशेष अधिकार समिती, पंचायत राज समिती, रोजगार हमी योजना समिती, आश्वासन समितीसह एकूण 25 समित्या विधानमंडळातर्गंत कार्यरत असतात.

या सर्व समित्यांवरील आमदारांच्या नावाची यादी लवकरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार हे सादर करणार असल्याची माहिती सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. महामंडळे आणि विविध शासकीय समित्यांवरील नियुक्यांमध्ये महामंडळाच्या वाटपात देखील काही बदल होण्याची शक्यता आहे.

भाजप-शिवसेनेचा वाटा घटणार असल्याची माहिती समोर येत असून भाजप ५०, शिवसेना २५ आणि राष्ट्रवादी २५ या फॉर्म्युल्यावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. असा फॉर्म्युला ठरला तर आगामी काळात कुठल्याच मंत्र्याकडे महामंडळाची जबाबदारी असणार नाही, त्यामुळे अन्य आमदारांची महामंडळावर वर्णी लागणार असल्याने उत्साहाचे वातावरण आहे.

Edited By- Ganesh Thombare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT