Dr. Baba Adhav 
मुंबई

प्रकृतीबाबत बाबा आढावांनी दिले निवेदन; ' हे सर्व निसर्गनियमानुसार...'

सरकारनामा ब्युरो

मुंबई : ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. बाबा आढाव (Baba Adhav) यांची प्रकृती गेल्या काही दिवसांपासून खालावली आहे. त्यांच्या प्रकृतीबाबत त्यांच्या शुभचिंतकही चिंतेत आहेत. या पार्श्वभुमीवर स्वत: डॉ. बाबा आढाव यांनी एका पत्राद्वारे निवेदन सादर करत स्वत:च्या प्रकृतीची माहिती दिली आहे.

''माझ्या भावंडांनो, सध्या मी घरीच आहे. त्याचं कारण मी थोडा आजारी आहे. आजाराचं कारण जे आहे ते तुम्हाला कळावं त्यासाठी माझं हे छोटेसे निवेदन तुम्हा सर्वांच्या माहितीकरिता. सध्या मला ब्याण्णव वर्षे चालू आहे. तरीसुद्धा माझी तब्येत अत्यंत सुदृढ आहे. परंतु निसर्गनियमा प्रमाणे वाढत्या वयाबरोबर काही व्याधीही मागे लागल्या आहेत.

हाडे ठिसूळ झाली आहेत आणि अश्या ठिसूळ झालेल्या पाठीचा मणका त्रास देतोय. त्याची योग्य ती आधुनिक तपासणी झाली आहे. तपासणीत हाडांच्या ठिसूळपणा बरोबरच काहीशी कॅन्सर सारख्या व्याधीची लागण झाल्याचे उजेडात आले आहे. ब्याण्ण्व्या वर्षात उपचाराला मर्यादा आहेत. अभिजीत वैद्य हे माझे कुटुंब डॉक्टर आहेत. त्यांच्या सल्ल्याप्रमाणे तसेच डॉ.राजेंद्र कोठारी, डॉ. विजय रमणम या सर्वांनी उपचाराची शर्थ चालवलेली आहे.

माझ्या मते हे सगळं निसर्गनियमाप्रमाणे घडतंय, त्यासाठी आगळं वेगळं काही करण्याची गरज नाहीये. त्यावर योग्य ते उपचार सुरू आहेत. मात्र माझ्या हालचालीवर मर्यादा आलेल्या आहेत. माझी खात्री आहे की मी यातून बाहेर पडेल व माझं रुटीन सुरू राहील. कृपया आपण कोणीही चिंता बाळगू नये व मला भेटण्याची घाई करू नये. कारण या आजारामूळे व त्यावरील औषधोपचारामूळे व्यक्तीची प्रतिकारशक्ती कमी होत जाते. आणि कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कुठल्याही प्रकारचे इनफेक्शन होणं माझ्या तब्येतीला धोकादायक ठरू शकते. बसल्या जागेवरून जे काय सहकार्य तुम्हाला करता येईल ते ऑनलाईन करेन. वेळोवेळी मी तुम्हाला तब्येतीची खुशाली कळवत राहीलच.

आपला,

डॉ. बाबा आढाव

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT