मुंबई : आमची सत्ता असताना विधानसभा अध्यक्षांची निवडणूक घ्या असे राज्यपाल यांना सांगत होतो, मात्र त्यांनी ती निवडणूक लावली नाही. आता नवे सरकार सत्तेत आल्यावर विधानसभा अध्यक्षांची निवडणूक लावली आहे. यावरुन काय चाललंय हे जनतेला दिसत आहे. अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे (ncp) प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील (Jayant Patil) यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagatsingh koshyari) यांच्यावर निशाणा साधला आहे. (Jayant Patil Latest news)
विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी (Assembly Speaker Election) महाविकास आघाडीकडून राजन साळवी (Rajan Salvi) यांनी आज अर्ज भरला. यानंतर जयंत पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला.यावेळी बाळासाहेब थोरात, जयंत पाटील, धनंजय मुंडे, दिलीप वळसे पाटील उपस्थित होते. साळवी हे राजापूरचे शिवसेनेचे आमदार आहे. काल राहुल नार्वेकर यांनी भाजपकडून अर्ज दाखल केला होता.
सत्ता बदलाच्या ज्या एकंदरीत घटना झाल्या त्या सर्व न्यायालयात गेल्या आहेत. १६ बंडखोर आमदारांचे निलंबन करण्याबाबत विधानसभा उपाध्यक्षांना काढलेल्या नोटीसीला सुप्रीम कोर्टाने ११ जुलैपर्यंत वेळ दिली होती. त्याच्याआधी अशी निवडणूक होऊ नये आणि सुप्रीम कोर्टात जे प्रकरण आहे त्याचा खुलासा झाल्यावर व्हावी, यासाठी महाविकास आघाडीच्यावतीने पत्र देण्यात आले असल्याचे जयंत पाटील यांनी यावेळी सांगितले.
विधानसभा उपाध्यक्षांच्या अध्यक्षतेखाली अध्यक्षांची निवड राज्यपालांकडे मागण्यात आली होती. परंतु राज्यपालांनी त्याला काही महिने परवानगी दिली नव्हती. असे सांगतानाच उद्या अध्यक्ष पदाची निवड होत असताना उपाध्यक्षांना पूर्णपणे सभागृहाचे काम करण्याचा अधिकार आहे. किंबहुना त्यांची ती जबाबदारी आहे ती निरपेक्षपणे पार पाडतील, असा विश्वासही जयंत पाटील यांनी व्यक्त केला.
विधानसभा अध्यक्ष निवडणुकीसाठी राहुल नार्वेकर विरुद्ध राजन साळवी असा सामना होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. शिंदे सरकारची बहुमत चाचणी आणि विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक यासाठी ३ आणि ४ जुलै रोजी विशेष अधिवेशन होणार आहे. ३ जुलै रोजी पहिल्याच दिवशी अध्यक्षपदाची निवडणूक होणार आहे. भाजपकडून (bjp) कुलाब्याचे तरुण आमदार राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.